19/07/2026
घे उंच भरारी...
आपण काहीतरी केलं पाहिजे या भावनेने "शिवशंकर"नं घर सोडलं... अन् थेट छत्रपती संभाजीनगर गाठलं.
व्यावसायिक प्रशिक्षण घेता-घेता हाताला दोन पैसे मिळावे म्हणून शिवशंकरने भाऊजींच्या मदतीने "स्वीट कॉन"चा व्यवसाय सुरू केलायं.
सुरुवातीला अनेक अडचणी आल्या. पण आता चांगला जम बसल्याचं शिवशंकर सांगत होता. दिवसाकाठी सर्व खर्च वजा जाऊन हजार ते दीड हजार रुपये उरतात...
शिवाजीराव जायभाये यांना तीन मुलींच्या पाठीवर झालेला एकुलता एक मुलगा... तो हाच "शिवशंकर". त्यामुळे सहाजिकच शिवशंकर अगदी लाडात वाढलेला...
काका हे शंकराचे निस्सिम भक्त... आपल्यावर महादेवाची कृपा म्हणून त्यांनी आपल्या मुलाचं नाव शिवशंकर ठेवलं असावं असं वाटतं...असो.
शिवाजी काकांची गावाच्या वेशीत हॉटेल होती... समोरच मल्लिकार्जुनआप्पा लंगोटे यांचं किराणा. डाव्या बाजूला दिलदार शेठ यांच किराणा दुकान... तर उजव्या बाजूलाच पांडुरंगमामा बोबडे यांचं हेअर कटिंग सलून होतं... कटिंग करण्यात मामा अगदी तरबेज...
अगदी तसंच स्वयंपाक करण्यात शिवाजी काकांचा हात कोणी धरायचे नाही...
मला आजही आठवतं, काकांच्या हॉटेलमध्ये प्रवेश केल्याबरोबर दरवाज्याच्या डाव्या बाजूला लटकलेले तराजू असायचं... अन् शेजारीच बनवलेला पोह्यांचा चिवडा, भजे... तर तिन्ही बाजूंना लोखंडी पत्रा लावून मध्यभागी स्टोवर ठेवलेलं चहाचं पातेलं...
गावाचं पुनर्वसन झालं अन् काकांच्या काकांच्या व्यवसायाने हाय खाल्ली...
पण हतबल न होता त्यांनी लग्न सोहळा, साखरपुडा इतर विविध ठिकाणी स्वयंपाकाचे काम घेण्याकडं अधिक लक्ष द्यायला सुरुवात केली.... यात त्यांनी चांगला जम बसवला...
या दरम्यान काकांनी आपल्या लेकरांना चांगलं शिक्षण दिलं... नविन गावात आपलं एक टुमदार घर बांधलं... सगळं सुरळीत सुरू असताना काकांना अचानक एक आजाराने गाठलं...
नावाप्रमाणेच काकांचा स्वभाव लढाऊ... कोणतीही परिस्थिती आली तरी हारायचं नाही. फक्त आणि फक्त लढायचं...
धाडस असेल तर काहीही होऊ शकतं हे त्यांनी पुन्हा दाखवून देत आजाराला सुद्धा हरवलं... ते आज ठणठणीत आहेत...
शिवशंकर सुध्दा शहरात येऊन आयुष्याच्या नवनवीन वाटा शोधतोय... त्याच्या बोलण्यातून गावाबद्दल जिव्हाळा दिसत होता. पण गाव सोडल्याशिवाय काहीच खरं नाही हे सांगायला तो विसरला नाही...
शिवशंकरच्या नविन व्यवसायला प्रचंड यश येवो हीच प्रार्थना...
#व्यवसाय
#सिनगावकर
#शेतकरी
#स्विट_कॉन