09/08/2018
#श्रीपाद #श्रीवल्लभ #जन्म #कथा
दत्तात्रेय आपळराज ब्राह्मणाच्या घरी गेले त्यावेळी श्राद्धकर्मासाठी आलेल्या ब्राह्मणांचे भोजन व्हावयाचे होते. ते झाल्याखेरीज अतिथीला भोजन घालणे शास्त्राच्या विरुद्ध होते; परंतु त्या तेज:पुंज अतिथीला विन्मुख पाठवणेही सुमतीला प्रशस्त वाटले नाही व तिने अगत्याने दत्तगुरूंना भोजन दिले. सुमतीचा उत्कट श्रद्धाभाव पाहून दत्तात्रेयांनी आपले खरे स्वरूप प्रकट करून तिला म्हणाले, की ‘‘माते, तुझ्या भोजनामुळे मी खूपच संतुष्ट झालो आहे. तुला काय हवे ते माग.’’ त्यावर सुमती समयसूचकतेने म्हणाली, की ‘‘आम्हाला एक सुलक्षणी पुत्र व्हावा, अशी आमची इच्छा आहे. कारण आम्हाला दोन पुत्र आहेत; पण आमच्या दुर्दैवाने एक पांगळा आणि दुसरा आंधळा आहे.’’
मग दत्तात्रेयांनी प्रसन्न हास्य करून ‘‘तथास्तु’’ असा आशीर्वाद सुमतीला दिला आणि ते अंतर्धान पावले. अशा रीतीने अमावस्येला अतिथीला भोजन देऊन तृप्त केल्यावर सुमती यथावकाश गर्भवती झाली. कालांतराने त्या ब्राह्मण दांपत्याला पुत्र प्राप्ती झाली. ‘श्रीपाद’ असे त्याचे नामकरण करण्यात आले. बीजेच्या चंद्राप्रमाणे श्रीपाद चंद्रकलेप्रमाणे वाढू लागला. सातव्या वर्षी त्याचे मौजीबंधन झाले व तेव्हापासून तो चारही वेद खडाखड म्हणू लागला. इतकेच नव्हे, तर मीमांसा आणि तर्कावर तो अधिकारवाणीने भाष्य करू लागला. परिणामी आपळराज व सुमती हे दांपत्य व पीठापूरच्या पंचक्रोशीतले ग्रामस्थ चकित झाले. यथावकाश श्रीपादच्या सोळाव्या वर्षी विवाहाचा घाट घालण्याचे आपळराज व सुमती दांपत्याने ठरविले व आपला मानस त्याला बोलून दाखवला; पण त्याने स्पष्ट शब्दांत नकार दिला व तो हसून म्हणाला, की ‘‘वैराग्य हीच माझी स्त्री असून अन्य स्त्रिया मला मातेसमान आहेत.’’ तसेच "जाणे असे उत्तरपंथा |दीक्षा द्यावया साधुजना ||"
असे आपले अवतारकार्य असल्याचे श्रीपाद वल्लभांनी त्यांना निक्षून सांगितले. इतकेच नव्हे, तर आपण आता तीर्थयात्रेला घर सोडून जाणार असल्याचा मनोदय आपल्या माता-पित्यापुढे प्रकट केला. परिणामी त्या दांपत्यावर जणू कुर्हाडच कोसळली. त्यांनी सर्वार्थाने श्रीपादला कडाडून विरोध केला; पण तो आपल्या निर्णयापासून तसूभरही ढळला नाही.
पुढे कालियुगाच्या प्रारंभी मलिन झालेल्या सनातन संस्कृतीला उजाळा देण्याकरिता व भक्त जनांना तारण्याकरिता "श्रीपादश्रीवल्लभ" नामक हा दत्तात्रेयांचा दुसरा अवतार पिठापूर नामक नगरात झाला. इ. स. १३२०. भक्तांनुग्रहाकारणे ते तीर्थ यात्रेस निघाले. फिरत फिरत रायचूर जिल्ह्यात असलेल्या कुरवपूर (कुरगड्डी) येथे येऊन वास्तव्यास राहिले. श्रीपादश्रीवल्लभांचे दिव्यरूप असे होते- पायात दिव्य खडावा, कटीला कौपिन व मेखला, अंगावर काशाय वस्त्र हातात कमंडलू, गळ्यात रुद्राक्ष माळ, कपाळी भस्म, व मस्तकी जटाजुट धारण केलेली, कमळा प्रमाणे प्रफुल्ल लोचनांची व मंद स्मितयुक्त चंद्रतुल्य मदन मनोहर वदनाची! श्रीपादप्रभूंची दया, क्षमा शमद मालांकृत भव्य मूर्ती अवलोकन करणारे सर्व लोक धन्य होत! ते कृष्णामाईत त्रिकाल स्नान करीत असत. रोज प्रातःकाळी संध्येत १००० गायत्री जपत तर सूर्यनारायणास १०८ नमस्कार घालीत.
मग सुमती कळवळून त्याला म्हणाली, की ‘‘अरे श्रीपादा, तू आम्हाला सोडून गेल्यावर तुझ्या पांगळ्या आणि आंधळ्या भावंडांकडे कोण बघणार? आम्ही काही जन्मभर त्यांना पुरणार नाही.’’ मंद स्मित करीत श्रीपादाने आपल्या दोन्ही बंधूंना हाक मारली आणि त्या दोघांच्या मस्तकावर हात ठेवला आणि काय आश्चर्य! पांगळा धावू लागला आणि आंधळ्याला दृष्टी आली. मग श्रीपाद जड अंत:करणाने निरोप घेऊन तीर्थयात्रेला रवाना झाले. श्रीक्षेत्र काशीला मनोवेगाने जाऊन तेथे गुप्त रूपाने राहिले. तेथून पुढे बद्रिकाश्रमात नारायणाचे दर्शन घेऊन गोकर्णास आले. तेथे तीन वर्षे वास्तव्य करून ते कुरवपुरास प्रकट झाले.
गंगा-यमुना या पवित्र नद्यांच्या तिरावर वसलेल्या कुरवपुरात एक वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण वास्तव्याला होता. त्याच्या पत्नीचे नाव ‘अंबिका’. ते ब्राह्मण दांपत्य दु:खी होते. त्यांची अपत्ये जगत नसत. कालांतराने त्यांना एक पुत्र झाला; पण तो मतिमंद होता. त्याचे विद्याभ्यासात लक्ष नव्हते. तो मतिमंद असला तरी जात्याच हूड होता. वेदाध्ययन न करता दिवसाचा बहुतेक वेळ तो गावात उनाडक्या करण्यात घालवत असे. परिणामी ब्राह्मण त्याला मारझोड करीत असे. तो रडू लागताच ब्राह्मणी आपल्या पतीला म्हणे, की ‘‘त्याला मारण्याचे तुम्ही थांबवले नाही तर मी प्राणत्याग करीन.’’
ब्राह्मणाचा निरुपाय झाला. त्याने मारझोड थांबवली; पण अल्पावधीतच किरकोळ आजाराचे निमित्त होऊन तो हे जग सोडून गेला. अंबिका, पतीच्या वियोगामुळे अतिशय दु:खी झाली. पित्याच्या मृत्यूचा त्या वांड मुलावर यत्किंचितही परिणाम झाला नाही. शेवटी ती एकुलता एक मुलगा अत्यंत मूढ निघाला म्हणून जीवनाला वैतागून गंगेत मुलासह देहत्याग करण्यास सिद्ध झाली होती. श्रीपाद श्रीवल्लभही त्यावेळी गंगास्नानासाठी तेथे आले होते. त्यांची तेजोमय, प्रसन्न मूर्ती पाहून देहत्यागापूर्वी त्यांचे दर्शन घ्यावे असा विचार करुन अंबिका मुलासह त्यांचेजवळ आली व आपल्या प्राणत्यागाचा हेतू प्रकट करून त्यांना म्हणाली, की ‘‘स्वामी, पुढच्या जन्मी तरी तुमच्यासारखा व सर्वांना पूज्य तसेच, वंदनीय पुत्र मला होऊ दे.’’ त्यावर श्रीपाद श्रीवल्लभ तिला म्हणाले, की ‘‘शनिप्रदोषाच्या दिवशी म्हणजे ज्या शनिवारी त्रयोदशी असेल त्या दिवशी, तू शंकराची मनोभावे पूजा कर. तुझी मनोकामना पूर्ण होईल.’’
श्रीपाद श्रीवल्लभांनाच कालांतराने ‘श्रीनृसिंह सरस्वती’ या नावाने अवतार घ्यावयाचा होता व त्याची ही पूर्वपिठीका अशा प्रकारे तयार झाली होती आणि ती सांगण्यासाठीच श्रीपाद श्रीवल्लभांचे चरित्र ‘गुरुचरित्रा’च्या कर्त्याने म्हणजेच सरस्वती गंगाधरांनी आपल्या ग्रंथात दिले आहे.
‘‘आणिक कार्य कारणासी | अवतार घेऊ परियेसी |
वेष धरुनि संन्यासी | नाम नरसिंहसरस्वती ||’’
या ओव्या या दृष्टीने चिंतनीय आहेत.