14/07/2025
Special thanks to Dr Aditi Ogale Aaryaa Joshi for sharing her article after these two episodes on ज्ञानयात्रा program
🪷🌺🪷🌺🪷🌺🪷🌺🍀🍀🍀🌿🌿🌿
चातुर्मासातील कथा-व्यक्तीविकास आणि सामाजिक जाणिवांची गुरुकिल्ली
डाॅ.आर्या आशुतोष जोशी
🪷🌺🪷🌺🪷🌺🪷🌺🍀🍀🍀🌿🌿🌿
श्रावण महिना म्हणजे व्रतवैकल्ये. चतुर्मासाची योजना हीच मुळी ईश्वरचरणी लीन होण्यासाठी झालेली आहे. पावसाळ्याचे चार महिने घराबाहेर पडणे यापेक्षा घरात अधिक काळ राहून, ईश्वरचिंतनात वेळ घालविणे, पचनसंस्थेला विश्रांती देणे अशी रचना चातुर्मासात असल्याचे दिसते.
भारतीय धर्म -संस्कृतीचे महत्वाचे साहित्य म्हणजे पुराणग्रंथ. सर्वसामान्य समाजमनाला संबोधित करत त्यांच्या व्यक्तिमत्वाला, कुटुंबजीवनाला आणि समाजजीवनालाही आकार देण्याचे काम पुराणग्रंथांनी केले आहे. स्कंद पुराणानेही अशाचप्रकारे चतुर्मास संकल्पना विशद केली आहे. माहेश्वर, वैष्णव,ब्रह्म, काशी, अवंती ( ताप्ती आणि रेवा) ,नागर आणि प्रभास हे या पुराणाचे खंड होत. यापैकी ब्रह्मखंडामधे चतुर्मास संकल्पना आपल्याला वाचायला मिळते.
श्रावण महिन्यातील प्रत्येक वारी करावयाची व्रते आपल्याला माहिती आहे.सोमवारी शिवामूठ , फसकी यांचे व्रत, मंगळवारी शिवमंगलागौरी पूजन, बुधवारी आणि गुरुवारी बुध आणि बृहस्पतीचे पूजन,शुक्रवारी जिवतीचे पूजन आणि घरातील अपत्यांना औक्षण करणे, शनिवारी संपत शनिवार आणि रविवारी आदित्य राणूबाईचे व्रत अशी ही व्रते सामान्यपणे दिसून येतात. याखेरीज चातुर्मासात करावयाची काही दैनंदिन व्रते उदा. एकभुक्त राहणे,अवचित मंगळवार, सूर्यनमस्काराचे व्रत इत्यादी.
व्रत या शब्दामधेच नियंत्रण करणे, अवरोध करणे असा अर्थ आहे. व्रत करून विकलता येते त्यामुळे व्रत -वैकल्ये असा शब्द प्रचलित आहे.
व्रतामधे पूजन, उपवास आणि दान या गोष्टी येतात. त्यामुळे व्रताशी संबंधित देवतेची पूजा करणे, त्या व्रताशी संबंधित कथा वाचणे, उपवास म्हणजे ईश्वराच्या निकट राहणे आणि अल्प आहार घेणे, आणि ब्राह्मणाला दान देणे अशा गोष्टींचा समावेश होतो. शिवमंगलागौरी,श्रावणी शुक्रवार अशा निमित्ताने सुवासिनींना बोलावून केले जाणारे हळदीकुंकू हा ही महिलांच्या सामाजिक जीवनाचा महत्वाचा भाग आहे.
या सर्व गोष्टींचा विचार करता एक बाब जाणवते की या कथा आणि व्रते ज्या काळात सांगितली गेली आहेत त्या काळातील सामाजिक आणि कौटुंबिक परस्थिती आजच्यापेक्षा निश्चितच वेगळी होती.त्यामुळे तत्कालीन समाजाचे, कुटुंबाचे, लोकांच्या मानसिकतेचे दर्शन या कथांमधनू घडते. आधुनिक कालाशी संगत अशा नव्या व्रतांची आणि कथांची निर्मिती करावी असाही एक विचार पुढे येताना दिसतो आहे.असे असले तरी चातुर्मासातील व्रते आणि ती व्रते विशद करण्यार्या कथा यांचे कंगोरे तपासून पहावेसे वाटले. त्यादृष्टीने हा एक अल्प प्रयत्न.
व्रत या शब्दामधे नियमितता अपेक्षित आहे त्यात स्वयंशिस्त आहे. योजलेले काम तडीस नेण्यासाठी केलेले प्रयत्न आहेत. नियमितता, शिस्त हे व्यक्तिविकासासाठी आवश्यक असेच गुण आहेत.चातुर्मासातील प्रत्येक व्रतात आणि ते व्रत सांगणार्या कथेत आपल्याला काहीवेळा अतिशयोक्तीपूर्ण माहितीही वाचनात येते. पण एकूणातच या कथांमधे व्यक्तिविकासासाठी, गुणवर्धनासाठी विशेष प्रयत्न करायला सुचविले आहे.
* विनायक हा विशेष नायक! समाजाचे संघटन उत्तम होण्यासाठी आणि बुद्धीचे वर्धन होण्यासाठी गणेशाची उपसाना आवश्यक आहे. शुभकार्याचा प्रारंभ गणेशस्मरणाने, पूजनाने होतो. कहाण्यांच्या प्रारंभी गणेशाचे व्रतच सांगितलेले आपल्याला दिसून येईल. देऊळ हे सामाजिक एकत्रीकरणाचे आणि धार्मिक आचराणाच्या सामूहिक प्रयत्नांसाठीची व्यवस्था आहे. मंदिर या वास्तूला पावित्र्य असते कारण तिथे देवतेचा वास असतो."मनाचा गणेश मनी वसावा" या विधानात गणेशाची उपासना सतत मनात जागती रहावी असा विचार आहे.त्या उपासनेने मिळालेले समाधान आणि शांतता आपले दैनंदिन आयुष्यही समृद्ध करते. जीवनाला शांतपणा मिळतो.
* व्रताशिवाय कुणी राहू नये हा आशय गोपद्माची कहाणी सांगत असावी. प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांनाही जाणवले की आपली बहीण सुभद्रा हिने कोणतेच व्रत केलेले नाही. त्यामुळे त्यांनी त्वरेने सुभद्रेची भेट घेऊन तिला वसा घ्यावयास सांगितले.गाय ही भारतीय धर्म संस्कृतीत मातेसमान मानली आहे. तिच्या खुरांमधून संध्याकाळी उडणारी धूळही मुहूर्ताला महत्व देते. गोरज मुहूर्त म्हणजे ज्यावेळी गायी संध्याकाळी घरी परत येतात त्यावेळी त्यांच्या पायांमुळे धूळ उडते ती वेळा शुभ मानली जाते.ब्राह्मणाचे घर हे पवित्र मानले जाई. अध्ययन- अध्यापन ,यजन यांची अनुष्ठाने ब्राह्मणाच्या घरी सतत होत असत.अश्वत्थवृक्षाचे म्हणजे पिंपळाचे महत्व ओळखून त्याच्या पारावरही गोपद्मे काढावी.तळे हे जीवन देणारे. समाजाची, वस्तीची पाण्याची आवश्यकता भागविणारे आणि गाईचे निवासस्थान म्हणजे गोठा हा पूर्वी घरोघरी असायचा.
ज्या काळात स्रियांना घराबाहेर पडता येत नसे त्याकाळात धार्मिक व्रताच्या निमित्ताने पावित्र्य जपल्या जाणार्या ठिकाणी त्यांनी जाणे औचित्याचे होते.व्रत असल्याने त्यात खंड पडूनही चालणार नाही.
कुमारिका ही देवीचे रूप मानली गेली आहे. शारदीय नवरात्रातही ललितापंचमीला कुमारिकापूजन केले जाते. अशा कुमारिकेचे पूजन या व्रताच्या उद्यापनात सांगितले आहे.
* पाचा देवांची कहाणी उपासनेतील सर्वसमावेशकता दाखवते. गाणपत्य, शैव, वैष्णव, शाक्त असे विविध देवता संप्रदाय भारतात उदयाला आले. या संप्रदायांनी आपल्याला पूजनीय देवतांचे महत्व ग्रंथांमधून, उपसाना पद्धतींमधून अधोरेखित केले. परब्रह्मतत्व एकच आहे. ते विविध रूपात प्रकट झाले आहे. भक्ताला जे रूप उपासनेसाठी आवडेल, भावेल आणि जी उपसना नियमाने आचरणे जमेल ते ते रूप त्याने स्वीकारले. पाच देवांच्या कहाणीत गणपती, विष्णू, शिव आणि नंदी,पार्वती यांचं पूजन आहे.व्रत स्विकारले की ते अर्धवट सोडू नये तर निग्रहाने पूर्ण करावे. तो निश्चयीपणा इतका असावा की त्यावर प्रत्यक्ष उपास्य देवतेनेही भक्ताप्रती खात्री व्यक्त करावी असा आशय या कथेत येतो.ब्राह्मणपत्नीने केलेल्या व्रताबद्दल देवतांनीही समाधान व्यक्त केले आहे हे या कथेतून दिसून येते.
* अंधारातून उजेडाकडे म्हणजे अज्ञानातून ज्ञानाकडे नेणारा दीप हा तेजाचे प्रतीक. त्याची उपासना आषाढ अमावास्येला करावी. स्वच्छतेचे महत्वही या कथेत दिसून येते. नित्य वापरातील,देवपूजेतील उपकरणांची, पूजनीय वस्तूंची स्वच्छताही आवश्यक आहे. ज्या काळात वीज उपलब्ध नव्हती त्याकाळात दिव्याचे महत्व ठसविणारी ही कथा. श्रावण महिन्यात पूजांमधे निराजनाचा वापर होणार त्यामुळे त्यापूर्वी त्यांची स्वच्छता, पूजन हे हृद्यच आहे.
* आपला सर्वांचा भार तोलून धरणारी भूमी ही सुद्धा मातेसमानच आहे. कृषी संस्कृतीत तर भूमीचे महत्व विशेष. धरित्रीच्या कहाणीतून सांगितलेले व्रत म्हणजे पंचमहाभूतांपैकी पृथ्वीतत्वाचे पूजनच होय.तिच्या सर्जनशक्तीमुळेच तर आपले आयुष्य समृद्ध आहे,सुस्थिर आहे.
* कुटुंब हा समाजव्यवस्थेचा कणा आहे. धन्यो गृहस्थाश्रमः।असे वचन प्रसिद्ध आहे. कुटुंबातील नात्यांची जपणूक, समाजाच्या सर्व स्तरातील घटकांची काळजी गृहस्थाने आणि गृहिणीने घ्यावयाची असते. ब्रह्मचर्याश्रमात मिळविलेले ज्ञान वापरून स्वतःचा आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा, सर्व इच्छांची पूर्ती करायची या जोडीने समाजाचेही ऋण फेडावयाचे या आश्रमात अपेक्षित आहे. नव्याने विवाहित युवतींना मार्गदर्शक अशी मूल्ये या कहाण्यांमधे दिसून येतात. * रविवारची आदित्यराणूबाईची कहाणी पाहिली तर राजाची राणी झालेली मुलगी पित्याकडे दुर्लक्ष करताना दिसते. तर प्रधानाची पत्नी झालेली युवती इपल्या वडिलांसाठी वेळ देताना,त्यांचा आदर आतिथ्य करताना दिसते.दारिद्र्याने पिचलेल्या बहिणीच्या मुलांना प्रधानाची पत्नी आवश्यक ती सर्व मदत करते आहे. आपले कर्तव्य पार पाडताना दिसते आहे. सूर्य म्हणजे तेजाचे केंद्र. चांगल्या कामाची बुद्धीला प्रेरणा देणारा सविता हे त्या सूर्याचेच एक रूप. गायत्री छंदातील सवितृ मंत्रात धियो यो नःप्रचोदयात् । असे आपण म्हणतोच. सूर्याचे महात्म्य ज्याने श्रवण केले त्या त्या व्यक्तीला सूर्यनारायण प्रसन्न झाला असे ही कथा सांगते. सूर्योपासनेचे महत्वच ही कथा आपल्याला सांगते.
* खुलभर दुधाची कहाणी तर डोळ्यात अंजन घालणारी आहे. राजाची दवंडी ऐकून घाबरून प्रजेने सर्व दूध शिवपिंडीवर नेऊन ओतले. घरातील मुलाबाळांनाही दूध प्यायला दिले नाही.परंतु एक आजी प्रथम कुटुंबाचा, घरातील पशुधनाचा विचार करते. घरातील कर्तव्ये पूर्ण करून,मुलाबाळांना खाऊ घालून, लेकीसुनांना न्हाऊ घालून,गाई वासरांना चारा घालून,सर्वांचा आत्मा थंड करून मगच ती शिवमंदिरात जाते. भक्तिभावाने दूध अर्पण करते. त्यामागे केवळ कृतीचा बाह्य-उपचार नाही. त्यामुळेच शिव प्रसन्न होतात आणि गाभारा भरून जातो.
पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति।
तदहं भक्त्युपहृतं अश्नामि प्रयतात्मनः।।
पान फूल फळ पाणी काहीही मला अर्पण कर. भक्तिभावाने अर्पण केलेले सर्व मला पोहोचते असे कृष्णानेही सांगितले आहेच.आणि त्यामुळेच त्या आजीच्या खुलभर दुधाने मंदिराचा गाभारा भरून जातो.
*शिवामूठीची सोमवारची कहाणी शिव आराधनेची आणि त्यामधे शिवाचे उपासक असलेल्या गुरवाला धान्यदान करण्यास सुचविले आहे. समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत, गरजूपर्यंत दैनंदिन जीवनातील आवश्यक गोष्टी पोहोचविण्याचे माध्यम म्हणजे ही व्रते.दानं संविभागः। म्हणजे जे मी सचोटीने कमावलेले आहे त्यातील काही उत्पन्न हे समाजासाठीही द्यावे असा उदात्त विचार यामागे आहे.
* मंगला म्हणजे कल्याण करणारी. शिव म्हणजेही कल्याणकारी.
कालिदासाने रघुवंशाच्या मंगलाचरणात म्हटलेआहे
वागर्थाविव सम्पृक्तौ वागर्थप्रतिपत्तये।
जगतः पितरौ वन्दे पार्वतीपरमेश्वरौ ।।
पार्वती आणि शिव हे जगताचे माता पिता आहेत त्यांना वंदन असो. शिव आणि पार्वती यांचा गृहस्थाश्रम आदर्श मानला जातो.
हरितालिकेच्या कथेतही विरागी शिवाच्या गुणांवर भाळणारी अपर्णा भेटते. हिमालयाची कन्या पण विष्णूच्या समृद्धीची तिला लालसा नाही. तपस्येत रममाण विरागी शिव तिला अधिक भावतो आणि त्याला ती तपस्येने जिंकून घेते. समृद्धीवर भाळण्यापेक्षा गुणांवर भाळणारी पार्वती आधुनिक युवतीनाही आदर्श वाटावा अशीच आहे.त्यामुळे शिवमंगलागौरी कथेत दैवत दांपत्याचे पूजन आपल्याला दिसते.
* बुध आणि बृहस्पतीची कहाणी अतिथीपूजनाचे महत्व सांगते. अलीकडे व्यस्त दिनक्रमात एकमेकांकडे जाताना आपण पूर्वनियोजन करतो. पण अशी कोणतीही पूर्वकल्पना न देता दारी आलेल्याचे स्वागत तत्कालीन कुटुंबव्यवस्थेत शक्य होते. एकत्र कुटुंब असल्याने घरे नांदती होती. कुणा ना कुणी घरात असायचे. शेतीमुळे आणि घरात पशू पाळलेले असल्याने त्यांना सांभाळण्यासाठी घरी कुणीतरी थांबत असे.राजा आणि त्याचे कुटुंबिय आपल्याला कहाण्यांमधे दिसते. राजा म्हणजेच संपन्नता. पण अतिथी विन्मुख गेला म्हणजेच आदरसत्कार झाला नाही. सतत नकार घेऊन अतिथी निघून गेल्याने राजाच्या कुटूंबाला विपन्नावस्था आली याचे हे उदाहरण. हात रिकामे नाहीत म्हणून दारी भिक्षेसाठी आलेल्या मामा भाच्यांना टाळणार्या सूना या कथेत आहेत. पण शक्य असतानाही आम्ही आमच्या " धर्माला" म्हणजे " कर्तव्याला" जागलो नाही हे जाणणारी सूनही या कथेत भेटते.
* धर्म म्हणजे आचरणाचे नियम. जो समाजाची धारणा करतो तो धर्म. त्यामुळे आपल्या कर्तव्यात कमी पडू नये, आहे त्या परिस्थितीत गरजूंना मदत करावी हा संदेश ही कहाणी देते.शनिवारची मारूतीची आणि संपत शनिवारची कहाणीही अशीच आहे.घरात जे उपलब्ध आहे त्यानुसार यथाशक्ती इतरांना मदत करावी, गरजू असेल त्याला आपलेसे करावे, कुणालाही टाळू नये असा भाव यामागे आहे. श्रावणात मिळणार्या रानभाज्याही केनीकुर्डूच्या नावामुळे समोर येतात. या रानभाज्या शहरात मिळणेही दुर्लभ. पण पोटाचे विकार टाळण्यासाठी ग्रामीण भागात आजही अशा रानभाज्या खाल्ल्या जातात.
आधुनिक काळात समाजव्यवस्था बदलत चालली आहे. शनिवारच्या कथेत भेटणारा लहान मुलगा किंवा कुष्ट्याचे रूप घेतलेला शनिदेव आजही समाजात दिसतो. पण भ्रष्ट व्यवस्थेत कुणावर विश्वास ठेवावा असा प्रश्नही स्वाभाविकपणे मनात येतो.तरीही विश्वसनीय माध्यमांद्वारे असे गरजू शोधून त्यांना मदत करण्याची संधी अवश्य घ्यावी.
ज्याकाळात गर्भावस्थेत अपत्याचे निधन होणे, प्रसूतीनंतर लगेच माता व बालक दगावणे, साथीच्या आजारात औषधे आणि उपचारांअभावी मुलांचे मृत्यु होणे असे प्रसंग घडत होते त्याकाळात जिवतीचे पूजन मातेच्या मानसिकतेशी सुसंगत असेच होते, नाही का? महाभारतात आलेली जरा राक्षसीची कथा आणि स्कंद पुराणातील जीवंतिका देवीचे व्रत एकमेकांशी साम्य दाखवते.
आपल्या बाळाला उज्वल भविष्य मिळावे, त्याला दीर्घायुष्य लाभावे अशी प्रत्येक आईची इच्छा आणि त्यासाठी ईश्वराला केलेली प्रार्थना जिवतीच्या पूजनातून स्पष्ट होते.माझा बाळ जिथे असेल तिथे सुखी असेल ही मातृत्वाची संवेदना जिवतीच्या कथेतून अधोरेखित होते. आई आणि अपत्याचं वात्सल्य त्यात दिसून येतं.
* शेतकर्याचा मित्र असलेल्या सापाची,नागाची पूजा आणि निसर्गातल्या सरीसृपांबद्दलचा आदर नागपंचमीच्या कथेत दिसतो.संत परंपरेने सर्पाकार कुंडलिनी शक्तीचे महत्वही आवर्जून विशद केलेले आहे.लोकपरंपरेत वारूळाला सर्जनाचे केंद्र मानले गेले आहे.ग्रामीण भागात शेणामातीचा नागोबा करुन तो आदराने पूजिला जातो.
* ऋषीपंचमीच्या कथेतून आपल्या प्राचीन प्रतिभावान ऋषींबद्दल कृतज्ञता दिसते. ऋषिःदर्शनात् । असेनिरूक्त या ग्रंथात यास्काचार्य म्हणतात. जो द्रष्टा आहे म्हणजे जो भविष्यचिंतन करतो,ज्याला भविष्यातील आव्हाने खुणावतात आणि त्यासाठी जो कटीबद्ध असतो, मार्गदर्शन करतो तो ऋषि!वैदिक परंपरेत केवळ ऋषीच नाही तरऋषिकांचेही महत्व अविवाद्य आहे. अशा सर्वांचे स्मरण या व्रतात करावे. शेतकर्याचा मित्र असलेल्या सर्जा राजाला विश्रांती द्यावी हा ही हेतू.
महिलांचा मासिक धर्म हा खरंतर नैसर्गिक गोष्ट. पण या काळात हौणार्या शारीरिक त्रासामुळे, भावनिक चढ ऊतारांमुळे येणारा अस्वस्थपणा टाळण्यासाठी महिलेला विश्रांती मिळावी हा हेतू. ज्याकाळात आधुनिक काळासारख्या सुविधा महिलांना उपलब्ध नव्हत्या त्याकाळात स्वतःची काळजी घेण्यासाठी महिलांनी मासिक धर्माचे चार दिवस स्वत:ला सांभाळावे यासाठी केलेला हा विचार. परंतु पुढे त्यामधे अपवित्रता जोडली गेली आणि महिलांना धार्मिक कृत्यात सहभागी होणेही अनौचित्याचे मानले गेले.पण आता विविध सुविधा उपलब्ध असताना महिलांनी व्रताचरण अवश्य करावे कारण ते मनाच्या बुद्धीच्या विकासासाठी आवश्यक आहे.
• समाजाचे नियमन व्हावे, व्यक्तिविकासातून कुटुंबाचाही विकास व्हावा यासाठी विविध विद्वानांनी विविध मार्ग सुचविले. ते सर्वच्या सर्व आचरणे कठीण.पण त्यापैकी निवडक अभ्यासकांनी विचारमंथनातून मांडलेले, पांचामुखी परमेश्वर या न्यायाने कसोटीवर उतरले गेलेले हे विचार. साठ पर्याय उपलब्ध असताना त्यातील पाच निवडणे आणि त्यांचे आचरण करीत विकास करणे, व्रतस्थ राहून आत्मोन्नती करणे हे सांगणारी कथा साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण म्हणत विराम घेते.
• आपल्याला आचरायला सोपे जाईल, आपल्या दैनंदिन जीवनाला शिस्त लागेल,ईश्वरप्रणिधानाची संधी मिळेल असा विचार करत आजही या कथांकडे "डोळसपणे"पाहण्याची आवश्यकता आहे. स्वातंत्र्यवीर सावरकारांनी देशाच्या स्वातंत्र्याचे " व्रत"च घेतले आणि म्हटलेही...
• की घेतले व्रत न हेअम्ही अंधतेने...
• याच आदर्शावर मार्गक्रमण करीत आपणही चातुर्मासातील कथे, कहाण्या आणि त्यातील व्रते यांच्याकडे डोळसपणे पाहण्याचा प्रयत्न करूया.. तसे जगूया... इतरांनाही मार्गदर्शन करूया..
( लेखिका धर्मशास्र विषयाच्या संशोधक आहेत.)
🌺🪷🌺🪷🌺🪷🌺🍀🍀🍀🌿🌿🌿
(मूळ लेखन माझ्या ब्लाॅगवर उपलब्ध आहे.)ज्ञानयात्राच्या ब्लाॅगवरही वाचायला उपलब्ध करुन देत आहोत.
ज्ञानयात्राच्या चतुर्मास संकल्पना भाग १,२ या व्याख्यान सत्रांमधे सांगितल्याप्रमाणे जिज्ञासु वाचकांसाठी हे लेखन पाठवीत आहे.