10/01/2021
पर्यटकांसाठी रत्नागिरीत नवं डेस्टिनेशन ......डागडुजीनंतर सज्ज झालेला नव्या रूपातील "पूर्णगड" किल्ला.
रत्नागिरी मध्ये आल्यावर आता पर्यटनाचे नवं ठिकाण खुल झालाय...कोकण च्या संपन्न इतिहासाचा साक्षीदार असलेला पूर्णगड किल्ला आता नव्या रूपात पर्यटकांसाठी सज्ज आहे..एका बाजूला समुद्राला येऊन मिळणाऱ्या मुचकुंदीचे विस्तीर्ण खाडी पात्र आणि दुसऱ्या बाजूला पसरलेला समुद्र... समुद्राच्या किनाऱ्यावर दोन एकर परिसरात हा किल्ला वसला आहे.गावातून जाणाऱ्या मार्गावरून अवघ्या 20 मिनिटात आपण किल्ल्यावर पोहोचतो...
मराठी आरमाराचे प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांनी इ. स.1725 मध्ये या किल्ल्याची उभारणी केल्याची नोंद आंग्रे शकावलीत आढळते.रत्नागिरी आणि जैतापूर दरम्यान समुद्र किनारी टेहळणी गढी म्हणून पूर्णगड उभारला गेला.गडावर पोहोचताच महाद्वारातून आत प्रवेश करण्यापूर्वी मारुतीच्या मोठ्या मूर्तीचे दर्शन घडते..गडाचे महाद्वार गोमुखी आहे...गडाच्या मुख्य भागातून समुद्राकडील बाजूला जाण्यासाठी तटबंदीत आकर्षक दगडी दरवाजा आहे...पूर्वी या समुद्राकडील तटबंदीच्या पलीकडे जाता येत नसे पण आता डागडुजी दरम्यान हि सुविधा करण्यात आली आहे.
कान्होजी आंग्रेंच्या मृत्यू नंतर इ. स.1732 मध्ये हा किल्ला पेशव्यांकडे आला...किल्ल्यावर त्या काळी पेशव्यांनी नेमलेल्या अधिकाऱ्यांचे वंशज आजही याच किल्ल्याच्या परिसरात रहातात.1818 मध्ये पेशव्यांची सत्ता संपताच पूर्णगड किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.या किल्ल्याच्या आसपास पूर्वी गाव नव्हता.इथे गाव व बाजारपेठ वसवण्यासाठी पेशवेकाळात 1774 मध्ये गणेशगुळे येथील भिकाजी नारायण फडके याना सनद देण्यात आली.
पण गेल्या अनेक वर्षात या किल्ल्याकडे दुर्लक्ष झाल्याने पूर्णगडचे काही बुरुज ढासळले...मुख्य किल्ल्याची मोठी पडझड झाली..बुरुजावर रुजलेल्या वड पिंपळानी तटबंदी खिळखिळी केली...गडावर पोहोचणे ही मुश्किल झाले... पूर्णगडाची ही सारी अवस्था दुर्गप्रेमींसाठी क्लेशदायक होती..
दरम्यान सरकारने राज्यातील काही गड राज्य संरक्षित करत त्यांच्या जतनाचा आराखडा तयार केला.4 कोटी 91 लाख रुपये खर्च करत आता पूर्णगड किल्ल्याच रूप पालटण्यात आलं.किल्ल्याच्या तटबंदीवर वॉकिंग ट्रॅक बांधण्यात आलाय त्यामुळे गडावरून खाडी पात्र आणि समुद्राची विलोभनीय दृश्य अनुभवता येतात...किल्ल्यावर दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाल्याची माहिती मिळते आहे...किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांना या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून पूर्णगडाची बेसिक माहिती देण्याकरीता काही करता येते का याच नियोजन प्रशासनाने केलं पाहिजे...
रत्नागिरीत आलेला पर्यटक पावस ला आवर्जून भेट देतोच..पावस पासून हा किल्ला अवघ्या सात किलोमीटर वर आहे.. अत्यंत निसर्गरम्य परिसरातील हा किल्ला आता डागडुजी नंतर रत्नागिरी येणाऱ्या पर्यटकांसाठी नवं डेस्टिनेशन आहे.
*मनोज भोइर*
*शहापूर*