18/04/2025
*आयुष्यात आलेला हा एक वेगळाच अविस्मरणीय अनुभव माझ्यासाठी होता.*
16 एप्रिल 2025 ला काश्मीरची सहल सुरू असताना गुलमर्ग येथे एक दुःखद घटना घडली. आमच्या सोबत असणाऱ्या पर्यटकांपैकी एकांना हृदयविकाराचा अतितीव्र झटका आला आणि त्यांनी या जगाचा अखेरचा निरोप घेतला. मला स्वतःला आणि माझ्यासोबतच्या पर्यटकांना हा फारच मोठा धक्का होता. मागील चार-पाच दिवस नवरा बायको आणि मुलगी असे कुटुंब आमच्या सोबत अगदी उत्साहाने सहलीचा आनंद घेत होते, त्यांच्या सोबत एक जिव्हाळा निर्माण झाला होता, ते आज आमच्या मधून अचानक नाहीसे झाले.
एका बाजूला सोबत असणाऱ्या पर्यटकांणी प्रसंग ओळखून खूप सहकार्य केले, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, सोबत आहोत असा विश्वास दिला. मयत कुटूंबातील नातेवायकांना गावी संपर्क करून पुढील नियोजन सुरु केले.
तसं पाहायला गेलं तर असा काही प्रसंग ओढवला तर नक्की काय करावे याचा पूर्व अनुभव नसल्यामुळे आम्ही सुरुवातीला गोंधळून गेलो, मात्र गेले अनेक वर्षाच्या पर्यटन क्षेत्राच्या अनुभवामुळे स्वतःला सावरून या परिस्थितीतून मार्ग काढू असा एक आत्मविश्वास होता.
सुरुवातीला आमच्यासमोर असंख्य प्रश्न उभे राहिले होते जसेकि चालू असणारी सहल पूर्ण करणे, हा दुःखद प्रसंग ओढवलेल्या कुटुंबाला सांभाळणे, इतर सहप्रवाशांची मानसिक स्थिती स्थिर ठेवणे, झालेल्या घटनेचा कायदेशीर पाठपुरावा करणे योग्य कागदपत्र हाताळणे असे एक ना अनेक प्रश्न पुढे येत गेले पण मला सांगायला खूप आनंद होत आहे या सगळ्या प्रसंगात आम्हाला कश्मीरमधील स्थानिक लोकांनी खूप खूप म्हणजे खूप सहकार्य केले. प्रामुख्याने गेली पाच-सहा दिवस आमच्या सोबत असणारे आमच्या गाडीचे चालक यांनी खूप सहकार्य केले,
गुलमर्ग / टंगमार्ग येथील सरकारी रुग्णालयातील डॉक्टर्स तसेच टुरिझम ऑफिसर, पोलीस विभाग, बारामुल्ला पोलीस विभाग, श्रीनगर येथील रुग्णालय आणि पोलीस विभाग, ॲम्बुलन्स असेल, आम्ही राहत असलेल्या हॉटेल मालकांचे सहकार्य, असे वेगवेगळ्या वेळेस बऱ्याच लोकांनी आम्हाला यामध्ये मदतीचा हात दिला आणि योग्य सहकार्य केले.
या सगळ्यांमध्ये एक सहानुभूतीयुक्त विचारपूस करणारी माणुसकी आम्हाला पाहायला मिळाली, बाहेरून आलेल्या पर्यटकांना कोणताही त्रास होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली जात होती चहापाण्याची विचारपूस केली जात होती.
घटना घडल्यापासून पुढील पाच तासात सगळी यंत्रणा उभी करून आम्हाला आवश्यक असणारी सर्व कागदपत्रांची पूर्तता करून दिली. त्यामध्ये डेथ सर्टिफिकेट, पोस्टमार्टम रिपोर्ट, एनओसी, लोकल ट्रान्सपोर्ट, ॲम्बुलन्स, विमान तिकीट या सगळ्यांची व्यवस्था त्यांनी केली, अगदी विमान तळावर सुखरूप पोहचे पर्यंत एक पोलीस आमच्या सोबत सतत होते,
आम्हाला कोठेही अडचण येणार नाही याची पूर्ण तयारी केली होती.
कश्मीरी लोकांमध्ये माणुसकीचा हा वेगळाच अनुभव आम्हाला पाहायला मिळाला.
*सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा!!!!!!*