01/05/2019
#बांगडा_Fry आणि #बोंबील_Fry
आमच्या निसर्गरम्य अलिबागला मस्त मोठ्या लांबीचा सुंदर समुद्रकिनारा लाभला आहे. त्यामुळे नानाविविध त-हेचे चविष्ट मासे आम्हा अलिबाग वासियांना खायला मिळतात. सकाळी सकाळी नागाव किंवा साताड बंदर दर्याकिनारी रात्रीच्या गेलेल्या बोटी लागतात आणि टोपल्या, पाट्या, चुंबळण आणि जाळ्या घेऊन एकच गडबड उडते. जाळ्यांतून आणलेल्या ताज्या सागरी खजिन्याची सराईतपणे वर्गवारी सुरू होते. मोठे मासे बहुदा मुंबईला किंवा अलिबाग मार्केट ला जातात. मग हारीने सगळ्या टोपल्या भरल्या जातात. मजा असते समुद्रावर जाऊन ही लगबग बघण्यात.
मुळातच आपुलकीने, मायेने बोलणा-या या मनमिळाऊ कोळिणी मावशी मस्त ताजे मावरे टोपल्या/पाट्या भरुन ताजी ताजी मच्छी बाजारात विकायला आणतात. पापलेट, रावस, बोयमासे, कोलंबी, बोंबील, मांदेळी, कालवे, खेकडे आणि करंदी फक्त हे काही मासे प्रकार आमच्याकडे खाल्ले जात. ह्याव्यतिरिक्तही काटी, माकले, ईल, शिंपले, खुबरी, निवट्या, राणीमासे, शिताडू आणि असे बरेच वेगवेगळे मासे अलिबाग मच्छीमार्केटमधे थोड्याबहूत प्रमाणात हजेरी लावतात.
भाव ठरवण्यात लाघवी, लटकी घासाघीस, मस्करी रोजचे गि-हाईक आणि मच्छीवाल्या मावशींमधे सुरू असते.
तर मग त्या मासे स्पेशल जेवणातील बांगडा Fry आणि बोंबील fry ची simple but tastiest recipe सांगते. बाकी recipes पुढच्या टप्प्यात!
१. बांगडा Fry:
सहा ब-यापैकी मोठे बांगडे मस्त साफ करून घेतले. अर्धा चमचा हळद पावडर, मध्यम तिखट अशी संकेश्वरी मिरची पावडर, दोन चमचे, रंगासाठी बेडगी मिरची पावडर, चवीपुरतं मीठ, चार चमचे आले-लसूण पेस्ट, दोन चमचे धणे, एका मोठ्या लिंबाचा रस हे सारे छान एकजीव केले व बांगड्याला आतून बाहेरून व्यवस्थित चोळले. पाडलेल्या खाचांमधे मुरवले.
थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडे मॅरिनेशन एकत्र कालवून बांगड्याच्या पोटाच्या पोकळीत भरले.
बांगडे २० मिनिटे झाकून मॅरिनेट करत ठेवले. तांदळाचे पीठ घेतले. त्यातही थोडेसे मीठ मिसळले.
जाड बुडाचा खोलगट पॅनमधे ब-यापैकी जास्त तेल गरम करत ठेवले. मॅरिनेटेड बांगड्याला तांदळाच्या पिठावर ठेऊन सर्व बाजूने पीठ लागेल अशा पध्दतीने हलकेच दाबून घेऊन मग पॅनमधल्या उकळत्या तेलात सोडून दिले.
बांगडा मांसल असल्याने दोन्ही बाजूंनी तळताना पलटणीने थोडा थोडा दाब दिला. सगळे बांगडे मस्त खरपुस तळुन घेतले.
पापलेट, सुरमई, रावस ह्यांनादेखिल असेच marinate करून fry केले कि झक्कास लागतात.
२. ओले बोंबील Fry:
बाकी मॅरिनेड बांगड्याला घेतले तसेच घ्यायचे. फक्त मी त्यामधे कोथिंबीर आणि मिरची पेस्ट अॅडिशनल घातली.
बोंबील स्वच्छ धुवून त्याला साफ करा. आणि तीन आडवे तुकडे करून मधोमध खोल चिर पाडा. दोन तुकडे होणार नाहीत ह्याकडे लक्ष द्या. मॅरिनेशन बों बलाच्या प्रत्येक सपाट तुकडयाला चोळून पंधरा-वीस मिनिटे मुरू द्या. मग तांदूळ+जरासा रवा अशा मिक्स पिठात दाबून घोळवून मस्तपैकी गरमागरम तेलात दोन्ही बाजूने खरपुस तळून घ्या.
तर असे हे मासे बनवणेचे काम, जितके सोपे तितकेच कौशल्याचे!!!
#बांगडे #बोंबील .