29/06/2019
प्रबळगड - मुरंजन
नाव प्रबळगड
उंची २३०० फूट
प्रकार गिरिदुर्ग
चढाईची श्रेणी कठिण
ठिकाण रायगड जिल्हा, महाराष्ट्र, भारत
जवळचे गाव
डोंगररांग माथेरान
सध्याची अवस्था व्यवस्थित
प्रबळगड - मुरंजन
किल्ले मुरंजन उर्फ प्रबळगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. हा किल्ला मुंबई-पुणे हमरस्त्यावरुन दिसतो. पूर्वेला उल्हास नदी, पश्चिमेला गडी नदी, दक्षिणेला पाताळगंगा नदी, माणिकगड आणि नैऋत्येला कर्नाळा किल्ला आहे, तसेच जवळच असलेला इरशाळगड.
इतिहास
उत्तर कोकणातील हा किल्ला त्याच्या मुलुखात असलेल्या पनवेल, कल्याण या प्राचीन बंदरांवर नजर ठेवण्यास असावा. किल्ल्यावरील गुहांच्या अभ्यासावरुन त्यांचा कालखंड बौद्ध कालाशी जोडता येतो. त्यांच्यावरील मनुष्यनिर्मित गुहांमुळेच उत्तरकालातील शिलाहार, यादव या राज्यकर्त्यांनी त्याला लष्करी चौकी बनवून मुरंजन असे नाव दिले. बहामनीच्या कालात हा किल्ला आकारास आला असावा. नंतर अहमदनगरच्या निजामशाहीच्या ताब्यात तो आला. निजामशाहीच्या अस्तावेळी शहाजीराजांनी निजामशाहीच्या वारसाला छत्र धरून निजामशाही वाचवण्याचा प्रयत्न केला. पण मोगल सम्राट शाहजहान आणि विजापूरचा आदिलशहा यांनी तह करून आपल्या संयुक्त फौजा शहाजीराजांच्या मागावर पाठवल्या. तेव्हा शहाजीराजे पळ काढून कोंढाणा व मुरंबदेवाच्या डोंगरात निघून गेले. नंतर कोकणात जंजिऱ्याच्या सिद्दीकडे गेले असता त्याने आश्रय नाकारल्यावर चौलला पोर्तुगीजांकडे गेले. पण त्यांनीही नकार दिल्यावर शहाजीराजे जिजाऊ, बालशिवाजी आणि लष्करासह मुरंजनावर गेले. सन १६३६ मध्ये बालशिवाजींनी मुरंजनाचा उंबरठा ओलांडला. १६३६ मध्ये माहुलीचा तह झाला. त्यात उत्तर कोकण मोगलांच्या ताब्यात गेले आणि मुरंजनवर मोगली अंमल सुरू झाला. पण प्रत्यक्षात तेथे विजापूरच्या अदिलशहाचीच सत्ता होती. पुढे ही संधी शिवरायांनी साधली. जेव्हा शिवरायांनी जावळीच्या चंद्रराव मोरेला हरवून जावळी ताब्यात घेतली, त्याचवेळी म्हणजे १६५६ मध्ये शिवरायांचा शूर सरदार आबाजी महादेव याने कल्याण भिवंडी पासून चेऊल ते रायरीपर्यंतचा सारा मुलूख स्वराज्यात घेतला. तेव्हा मुरंजन शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला. किल्ल्याचे नाव बदलून किल्ले प्रबळगड असे ठेवण्यात आले. पुढे १६६५ मध्ये पुरंदरच्या तहानुसार मोगलांना दिलेल्या २३ किल्ल्यांमध्ये प्रबळगड शिवाजी महाराजांनी दिला. जयसिंगाने किल्ल्यावर राजपूत केशरसिंह हाडा हा किल्लेदार नेमला. पुढे पुरंदरचा तह मोडला. मराठे किल्ले परत घेत असतांना मराठयांशी झालेल्या लढाईत केशरसिंह धारातीर्थी पडला. तत्पूर्वी राजपूत स्त्रियांनी जोहार केला. केशरसिंहाची आई व दोन मुले किल्ल्याच्या झडतीत सापडले.शिवरायांच्या आदेशानुसार त्याने सन्मानाने देऊळगावी मोगल छावणीत पाठवण्यात आले. नंतर किल्ल्यावर खोदकामात बरीच संपत्ती आढळली.
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे
प्रबळगडचा माथा म्हणजे एक मोठे पठार आहे. सर्व पठारी भाग हा जंगलाने व्यापलेला आहे.
* गडावर एक गणेश मंदिर आहे. तसेच तीन पान्याच्या टाक्या सुध्दा आहेत. मात्र ही टाकी शोधण्यासाठी व गडावर फिरण्यासाठी बाटल्या घेणे आवश्यक आहे.
* प्रथम इंग्रजांनी प्रबळगडचा माथेरान सारखे थंड हवेचे ठिकाण म्हणून करण्याचा विचार केला होता मात्र पाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळे तो विचार मागे पडला.
* गडावर तीन चार इमारतींचे अवशेष आहेत. घनदाट कारवीच्या जंगलामुळे गडावरील वाटा नीट दिसत नाहीत.
* मात्र गडावरुन माथेरानचे विविध पाँईट फार सुंदर दिसतात.
पोहोचण्याच्या वाटा :
१ शेडुंग मार्गे :- मुंबईहून किंवा पुण्याहून येणार्यांनी पनवेल गाठावे. जून्या पनवेल - पुणे हमरस्त्यावर शेडुंग गावाकडे जाणारा फाटा आहे. एस्टी चालकांना सांगून शेडुंग फाट्यावर उतरावे. हमरस्त्यावरून जाणारी वाट पकडावी अर्ध्या तासाच्या रस्त्यावर शेडुंग गाव लागते. शेडुंग गावापासून (अंतर ५ किमी) ठाकुरवाडीपर्यंत चालत जावे. ठाकुरवाडी हे गडाच्या पायथ्याचे गाव आहे. गावातून बैलगाडीची वाट थेट आपल्याला प्रबळमाचीवर घेऊन जाते. प्रबळमाचीवर जाण्यास १ तास लागतो. प्रबळमाची गावातून समोरच किल्ला व कलावंतीणीचा सुळका यामधील खिंडीतून कलावंतीणीच्या सुळक्यावर जाण्यासाठी कातळात खोदलेल्या पायर्यांची वाट आहे. या घळीतून कलावंतीणीच्या सुळक्यावर जाण्यासाठी पाऊण तास लागतो.
प्रबळमाची गावातून किल्ल्याचा माथा डावीकडे ठेवत ३० मिनीटे चालल्यावर एक घळ दिसते . येथून गडावर जाण्यास एक तास पुरतो. ठाकूरवाडी जाण्यास पनवेलहून बसेस आहेत.
२ पोईंज मार्गे : पनवेल चौक मार्गावर शेडुंगच्या पुढे पोईंज फाटा आहे. तिथे उतरून पोईंज गावात पोहचावे. येथे समोरच असणार्या डोंगर सोंडेवरून प्रबळमाची या गावात जावे. येथून दीड ते दोन तासात प्रबळगड गाठावा.
३ माथेरान ते प्रबळगड : माथेरान जवळील शार्लोट जलाशया जवळील श्री पिसरनाथ मंदिराजवळून डावीकडे वळल्यावर दहा मिनिटात आपण एका घळीत येऊन पोहोचतो. लोखंडी शिड्यांच्या साहाय्याने दोन तासात आकसर वाडी या गावात पोहोचता येते. आकसर वाडीतून प्रबळगडचा डोंगर चढत काल्या बुरूजाखाली असलेल्या पठारावरून घळीतून वर चढत गडमाथा गाठावा लागतो.
राहाण्याची सोय :
गडावर रहाण्याची सोय नाही. शेडुंग गावातील शाळेच्या कट्ट्यावर २५ ते ३० माणसांची झोपण्याची सोय होऊ शकते
पाण्याची सोय :
बारमाही पिण्याच्या पाण्याच्या टाक्या आहेत