02/05/2018
पाणी महाल :
मुख्य किल्ला आणि रणमंडख हे किल्ल्याचे दोन भाग पाणी महलने जोडलेले आहेत. इब्राहिम आदिलशहा दुसरा याने बोरी नदीवर दगडी धरण बांधून त्यात पाणी महालाची योजना केलेली आहे. हे धरण व महाल बेसाल्ट दगडात बांधलेले आहे. पावसाळ्यात बोरी नदीला पूर आल्यावर पाणी महालावरुन पडते. हे पाणी दोन ठिकाणांहून खाली पडते. हे दोन धबधबे नर व मादी या नावाने ओळखले जातात. यामुळे किल्ल्याच्या नैसर्गिक सौंदर्यात खूपच भर पडली आहे. धरण बांधून बोरी नदी अडविल्यामुळे पाणी अडून या पाण्याचा उपयोग किल्ल्यात पाणी पुरविण्यासाठीही करुन घेतल्याचे दिसते.
बुरुज :
नळदूर्ग किल्ल्याची तटबंदी अतिशय मजबूत असून ती काळ्या बेसाल्ट दगडात बांधलेली आहे. या तटबंदीत एकूण ११४ बुरुज आहेत. या तटबंदीत परांडा बुरुज, उपळा बुरुज आण्णाराव बुरुज, बंदा नवाज बुरुज, नव बुरुज इत्यादी नावे आहेत. परांडा बुरुज हे किल्ल्याच्या उत्तर-पूर्व बाजूस असून परांडा किल्ल्याच्या दिशेस आहे. या बुरुजावरुन त्याकाळी मोठा झेंडा किंवा मशालीच्या सहाय्याने परांडा येथील किल्ल्यातील लोकांना संदेश दिला जाई असे म्हणतात. नवबुरुज हा स्थापत्य शास्त्राचा उत्तम नमुना आहे. या बुरुजास नऊ छोटे-छोटे कंगोरे अशी रचना केलेली आहे, म्हणून या बुरुजास नवबुरुज म्हणून ओळखले जाते.
जामा मशिद :
मुन्सीफ कोर्टच्या समोरील बाजूस एक मशीद असून ती जामा मशीद या नावाने ओळखली जाते. ही मशीद दगडी चौथऱ्यावर बांधलेली आहे. या मशिदीच्या समोरील दर्शनी बाजूस तीन कमानी असून वरच्या बाजूस चार मिनार व मध्यभागी घुमट आहे. या मशिदीवर भौमितीक, पाने-फुले यांचे नक्षीकाम केलेले दिसते.
रंग महाल :
बारा इमाम इमारतीच्या पुढेच रंग महाल ही इमारत आहे. या रंग महालातही अनेक दालनांचा समावेश आहे. याठिकाणी संगीत, नृत्य इ. कार्यक्रम होत असे. या महालातच गोवळकोंड्याच्या राजकन्येशी दुसरा इब्राहिम आदिलशहाचा विवाह सोहळा थाटात झालेला होता.
रण मंडळ :
पाणी महालाच्या पश्चिमेस हा भाग आहे. हा भाग रणमंडळ या नावाने परिचित आहे. हा किल्ल्याचा अंतिम भाग आहे. रणमंडळाचा भाग त्रिकोणाकृती असून याच्या बाजूस बोरी नदी वाहते. स्थानिक बोली भाषेत रणमंडळ म्हणजे युद्धाचे ठिकाण. बहुधा याठिकाणाचा वापर युद्धाचा सराव करण्यासाठी केला जात असावा. या रणमंडळात कोणतेही वास्तु अवशेष नाहीत. रणमंडळ परिसरात सैन्यांची छावणी असावी.
⛺️