27/08/2024
जय श्री कृष्णा
आज सर्वत्र कृष्णजन्माचा महोत्सव सुरू आहे. लहान मुलं घराच्या भोवतालच्या परिसरात दहीकाला उत्सव साजरी करत आहेत. गल्लोगल्ली बांधलेल्या हंड्या फोडायला गोविंदा पथकं बाहेर पडली आहेत.. ७/८ थर बनवून हंडी फोडली जात आहे. हंडी फुटू नये म्हणून त्यांच्या अंगावर पाण्याचा वर्षाव करणारे रहिवाशी. त्यातून हंडी फुटली तर एकच जल्लोष, नाही फुटली तर पुढील हंडी फोडण्यासाठी हसत हसत प्रस्थान. वरूणराजाची मर्जी असली तर पावसाची रिमझीम झेलत मजा लुटणारे गोविंदा पथक व बच्चा कंपनी हे सर्व माहित नसणारा व न अनुभवलेला विराळाच.
कृष्णजन्म, कृष्णाचे बालपण, त्याची कुटनिती / राजनिती, गितासार ( काही प्रमाणात माहिती असेलच ), त्याचा मृत्यू हे सर्व आपण वाचत / ऐकत / बघत ( टिव्ही / मोबाईल ची कृपा ) लहानाचे मोठे झालो. आसपासच्या परिसरांत असलेली देवळं, इस्कॅानच्या कृपेने परदेशात स्थानापन्नं झालेली देवळं हे सर्व का परिचयाचे झाले आहे. परंतू आज अश्या देवळाबद्दल मी सांगणार आहे ज्या देवळाबद्दल फार कमी लोकांना त्याबद्दल माहिती असेल….
हिमाचल प्रदेशातील किनॅारमध्ये युला गावात १२,५०० फुटांवर ( जगातील सर्वात ऊंचीवर ) डोंगरमाथ्यावर तलावाच्या मधोमध श्रीकृष्णाचे देऊळ आहे. अतिशय विलोभनीय परिसर, चारही बाजूंनी हिमालय पर्वत, शांत परिसर, स्वच्छ तलाव व त्याच्या मधोमध छोटंसं पण सुबक मंदीर. दरवर्षी गोकुळाष्टमीला इथे मोठा ऊत्सव असतो. आजूबाजूच्या गावांमधून बरीच लोकं दर्शनाला येतात.
युला गावापर्यंत रस्ता आहे. पंरतु पुढे ट्रेक करून जावं लागतं, साधारणतः १२-१३ किलोमीटरमधे ५-६ किलोमीटर रस्ता जंगलातून आहे तर पुढील रस्ता जरा अवघड आहे. वर्षभरात केवळ जून ते ॲाक्टोबर महिन्यांत इथे बर्फ नसतो. उर्वरित महिने तलाव देखील गोठलेलाच असतो. वाटेत कुठेही रहाण्याची सोय नाहीए. त्यामुळे एका दिवसांत वर पोहोचून दर्शन घेऊन खाली यावे लागते. तुमची तंबू बांधून रहायची तयारी असेल तर तशी जागा आहे, पण सर्व तयारिनिशी जावं. युला गावात रहाण्याची काही प्रमाणात सोय केली जाते, पंरतू ती साधी राहणी. सोयीसुविधांची जास्त अपेक्षा न करतां गेलांत तर नक्कीच समाधानी व्हाल.
चला तर मग जाऊ जगातील सर्वात ऊंचावरील श्रीकृष्णाच्या देवळांत दर्शनाला..
पराग शेणोलीकर
फोक्सी आऊटडोअर