07/01/2021
वासोटा - व्याघ्रगड .....
"येता जावली जाता गोवली", "तुम्हांमध्ये पुरुषार्थ असला तर, उदईक याल तर आजच यावे", "येथे उपाय कराल तर तो अपाय होईल. यश घेता अपयशास पात्र होऊन जाल.” जावळीच्या चंद्रराव मोऱ्याने छत्रपती शिवाजी महाराजांस असे आव्हानात्मक पत्र लिहिण्याची हिंमत केली ती जावळीच्या भौगोलिक परिस्थितीचा फायदा घेऊनच. सह्याद्रीच्या रांगेत घनदाट अरण्यात असलेला हा जावळीचा मुलुख केवळ अजिंक्य होता. शिवाजी महाराजांनी मोरेंना योग्य शासन करून जावळीचा मुलुख ताब्यात घेतला व पुढे याच जावळीच्या भौगोलिक परिस्थितीचा फायदा अफजलखानाचा बीमोड करताना देखील झाला.
या दुर्गम जावळीच्या प्रांतात किल्ल्यांविषयी सांगायचं तर रायगड, लिंगाणा, चंद्रगड, खेळणा, कांगोरी, कावळया, मकरंदगड, सोनगड, चांभारगड, महिपतगड, प्रतापगड (भोरप्या), रसाळगड, सुमारगड, जननीदुर्ग, वासोटा इ. किल्ले होते.
यातला दुर्ग प्रेमींसाठी एक आवडते, नैसर्गिक दुर्गमता लाभलेला जावळीच्या जंगलामधले एक अनोखे दुर्गरत्न म्हणजे वासोटा. कोयना नदीवर पाटण जवळ कोयना धरण असून त्याच्या जलाशयाला शिवसागर म्हणतात, ज्याचे पाणी तापोळापर्यंत पसरलेले आहे. सह्याद्री आणि शिवसागरचे पाणी यामधील भागात घनदाट अरण्य आहे. याच अरण्यात आहे वनदुर्ग वासोटा. शिवसागराचे पाणी वासोटा किल्ल्याच्या पायथ्याला स्पर्श करते, त्यामुळेच पूर्वेला घनदाट अरण्य आणि पश्चिमेला कोकणात कोसळणारे बेलाग कडे यामुळे वासोट्याची दुर्गमता खूप वाढली आहे.
वासोटा ज्या डोंगरावर आहे तेथे वसिष्ठ ऋषींचा एक शिष्य राहत होता, म्हणून त्याने या डोंगराला आपल्या गुरूंचे नाव दिले, अशी आख्यायिका आहे. ’वसिष्ठ’चे पुढे वासोटा झाल असावेे, अशी कल्पना आहे. शिलाहारकालीन राजांनी या डोंगरावर किल्ला बांधला. या किल्ल्याची मूळ बांधणी ही शिलाहार वंशीय दुसर्या भोजराजाने केली असल्याचा उल्लेख आढळतो.
वासोट्याचे नाव महाराजांनी व्याघ्रगड असे ठेवले. याच्या दुर्गमतेबद्दल पेशवाईत सुद्धा नोंद आहे. शिवाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याचा वापर 'तुरुंग' म्हणून केला जात असे. याचे कारण तेथील निर्जन व घनदाट असे अरण्य. पूर्वी तेथे वाघ, बिबट्यांसारखे प्राणीही होते हे प्राणी अजूनही आहेत.
शिवाजी महाराजांनी जावळी जिंकल्यानंतर आसपासचे अनेक किल्ले घेतले, पण वासोटा जरा दूर असल्याने घेतला नाही. पुढे शिवाजी महाराज पन्हाळगडावर अडकले असताना आपल्या मुखत्यारीत मावळातील पायदळ पाठवून त्यांनी वासोटा किल्ला दि ६ जून १६६० रोजी घेतला.
अफझलखाच्या वधानंतर शिवाजी महाराजांच्या दोरोजी या सरदाराने राजापुरावर हल्ला करून तेथील इंग्रजांना अफझलखानाच्या गलबतांचा पत्ता विचारला. त्यांनी सांगितला नाही म्हणून इंग्रजांच्या ग्रिफर्ड नावाच्या अधिकार्याला अटक केली व वासोट्यावर ठेवले. सन १६६१ मध्ये पकडलेल्या इंग्रज कैद्यांपैकी रेव्हिंग्टन, फॅरन व सॅम्युअल यांना वासोट्यावर कैदेत ठेवण्यात आले होते. पुढे १६७९ मध्ये वासोटा किल्ल्यावर २६,००० रुपये सापडले. पुढच्या काळात १७०६ मध्ये ताई तेलिणीने हा किल्ला आपल्या हातात घेतला. पुढील वर्षी पेशव्यांचे सेनापती बापू गोखले यांनी ताई तेलिणीबरोबर लढाई केली. आठ-दहा महिन्यांच्या प्रखर झुंजीनंतर ताई तेलिणीचा पराजय झाला आणि १७३० मध्ये वासोटा किल्ला बापू गोखल्यांच्या हाती पडला.
त्यासंबंधी एका जुन्या आर्येमध्ये वासोट्याचा गमतीचा उल्लेख आहे. तो असा -- "श्रीमंत पंत प्रतिनिधी यांचा अजिंक्य वासोटा;तेलिण मारी सोटा, बापू गोखल्या सांभाळ कासोटा."
वासोट्याला जाण्यासाठी प्रामुख्याने दोन मार्ग आहेत. एक कोकणातील चिपळूण, चोरवणे या गावा कडून नागेश्वराच्या सुळक्याकडून वासोट्याकडे येता येते. महाबळेश्वर- तापोळा किंवा सातारा- बामणोली येथून शिवसागर लॉचेस द्वारे वासोट्याकडे जाता येते. पायथ्याजवळ मेट इंदवाली नावाचे गाव होते. ते फार पूर्वीच उठून गेलेले आहे. त्याचे अवशेष अजूनही दिसतात. या अवशेषांच्या जवळूनच गडावर जाणारा धोपट मार्ग आहे. पायथ्याला ओढ्याकाठी मारुतीची मूर्ती आहे. येथूनच किल्ल्याची चढण आणि जंगल सुरू होते. चढाईचा मार्ग दुतर्फा असलेल्या घनदाट जंगलामधून जातो. यात वेगवेगळ्या प्रकारची झाडे व वनस्पती आपल्याला दिसतात. या जंगलात अनेक प्रकारची वन्य श्वापदे आहेत.
अर्धाअधिक किल्ला चढल्यावर एक वाट उजवीकडे जाते. ही वाट केतकीच्या गाद्याजवळून पुढे नागेश्वराकडे जाते. सरळ वाटेने वर चढल्यावर जंगल विरळ होऊन कारवीचे रान लागते. कारवीच्या रानातून वर चढल्यावर किल्ल्याच्या पायर्या लागतात. त्या चढून भग्न प्रवेशद्वारातून गडात प्रवेश होतो.
गडाच्या पडक्या प्रवेशद्वाराजवळून डावीकडील तटबंदीच्या कडेने जाऊन पूर्वेकडील बाजूस पोहोचल्यावर शिवसागर जलाशयाचा आणि अथांग पसरलेल्या जंगलाचा देखावा आपल्याला मुग्ध करतो. याच बाजूला पाण्याचे टाके आहे. हे टाके भिंतीमुळे दोन भागात विभागले गेले आहे. पिण्यायोग्य पाणी गडावर येथेच आहे. येथून झाडीतून दक्षिण टोकावर गेल्यावर समोरच जुना वासोट्याचा डोंगर दिसतो. जुन्या वासोट्याच्या बाबू कड्याचे तसेच पाताळवेरी गेलेल्या दरीचे दृश्य आपल्याला खिळवून ठेवते. गडावर सर्वत्र झाडीझाडोरा वाढला असल्यामुळे गडावरच्या वास्तू त्यात लुप्त झाल्या आहेत. वाटेवर मारुती मंदिर, मोठ्या वाड्याचे अवशेष तसेच महादेव मंदिर आहे. तेथून पुढे उत्तरेकडील माची आहे. या माचीवर बांधकाम नाही. पण येथून दूरपर्यंतचा परिसर दिसतो. नागेश्वर सुळक्याचे दर्शन उत्तम होते. कोकणातील विस्तृत प्रदेशही येथून न्याहाळता येतो. वासोटा हा गिरिदुर्गाबरोबरच वनदुर्गसुद्धा आहे. म्हणून याला 'मिश्रदुर्ग' म्हटले जाते. येथून दिसणारे नागेश्वर शिखर फारच सुंदर दिसते. नागेश्वर सुळक्याच्या अलीकडे आणखी एक सुळका आहे त्याला तुळशी वृंदावन , खोटा नागेश्वर किंवा ठेंगा असे नाव आहे.