08/10/2017
किल्ले सिंदोळा
हा किल्ला म्हणजे निसर्गाने केलेली उधळणच म्हणावे लागेल. याचे दर्शन आपणास कल्याण, अहमदनगर महामार्गने जुन्नर तालुक्यातील मढ गावच्या पश्चिम सह्याद्री रांगेवर घडते. उंच उंच सह्याद्रीच्या कड्यांनी वेढलेला हा परीसर अक्षरक्षः पर्यटकांना पहाताचक्षणी वेड लावतो. विविध पक्षी, वनस्पती, प्राणी किटक या परिसरात अभ्यासावयास मिळतात. चित्रपट सृष्टी तर येथील लावण्यावर येवढी फिदा झालेली दिसते की सांगायलाच नको.
हरिश्चंद्रगड , माळशेज घाट या किल्याचे सखेच जणू. येथुन सुशोभित दिसणारा परिसर स्वर्गात पदार्पण केल्याचा भास निर्माण करतो. परंतु या किल्याला पाठीमागील काळाची नजर लागली व यावर जाणारे मार्ग नैसर्गिक आपत्तीत सापडून जमिनदोस्त झाले. पायरी मार्ग गाडले गेले. संरक्षण भिंतीचे सडलेल्या जनावरांप्रमाणे ठिक ठिकाणी सापळे शिल्लक राहिले. पाण्याच्या टाक्या गाडल्या गेल्या. परंतु कातळात वर मुख्य दरवाज्या पाशी पश्चिम मुखी आष्टभुज नग्न गणपती कातळात आजही या किल्याची ओळख देत वर्षे नु वर्षे उन, वारा, पाऊस झेलत उभा आहे. गडावर जुन्या इतिहास शिल्पांची ओळख देणारी शिवपिंड असून गावातील ग्रामस्थांना आशिर्वाद देत आहे.
या गडाचा संवर्धन होणे गरजेचे आहे. गाडलेले पायरी मार्ग, पाण्याच्या टाक्यांचे संवर्धन करून या गडाला गडपण देण्याचा प्रयत्न केला तर इतिहासकालीन निश्चितच या द्वारे पिढ्या न पिढ्या जिवंत राहील असे वाटते.
माहिती आणि छायाचित्र साभार -
श्री. रमेश खरमाळे (माजी सैनिक खोडद)
#जुन्नर #सिंदोळा