इतिहास म्हणजे केवळ राजे,त्यांचे सरदार,शस्त्रे,नाणी आणि लढायाइतकाच नसतो तर सामान्य लोक, त्यांचे दैनंदिन जीवन, त्यांच्या रोजच्या वापरातील वस्तू हा सुद्धा त्या त्या काळातील समाजाचाइतिहासच असतो. समाजाचा इतिहास हा बहुतांश वेळा दुर्लक्षितच असतो.
काळाबरोबर आणि बदलत्या तंत्रज्ञानाबरोबर जगण्याच्या शैलीत भराभर बदल होत गेला आणि रोजच्या वापरातील वस्तू कधी बाजूलापडल्या हे आपल्या लक्षातदेखील आले नाही.
गेल्या
2 दशकात तर हा वेग इतका वाढला की अनेक वस्तू अडगळीत गेल्या यात रेडिओ,टेलिफोनपासून अगदी आपल्या आवडीच्या अनेक वस्तूंचा समावेश आहे.
या सगळ्या वस्तूंशी आपल्या अनेक आठवणी व भावना जोडलेल्या असतात.
विक्रम पेंडसेंचे हे संग्रहालय म्हणजे गेल्या शतकातल्या समाजजीवनाचे धावते चित्रच आपल्यासमोर उभे करण्याचा एक प्रयत्न आहे.
विक्रम पेंडसेंच्या संग्रहालयाचे प्रमुख आकर्षण म्हणजे सायकल.
आपल्या सगळ्यांच्याच आठवणीत सायकल अगदी घट्ट रुजलेली आहे, लहानपणी आजोबांनी हौसेनं घेऊन दिलेली तीनचाकी सायकल,कॉलेजमध्ये जाण्यासाठी आई बाबांनी घेऊन दिलेली सायकल आणि त्या सायकलच्या सोबतीने आपण केलेल्या अनेक सहली.
विक्रम पेंडसे यांना लहानपणापासूनच सायकल व मोटरसायकलीचे अप्रूप होते. 22 वर्षांपूर्वी दुसऱ्या महायुद्धात वापरली गेलेली BSA Paratrooper ही सायकल हाती आल्यानंतर सूरु झालेली ही वाटचाल आज एका संग्रहालयात परिवर्तित झालेली आहे.
जीर्ण अवस्थेत असणाऱ्या अनेक सायकली मूळ रुपात परत आणण्यासाठी विक्रम यांना साथ मिळाली ती श्री. पांडुरंग गायकवाड यांची.
गायकवाड हे सुद्धा सायकलप्रेमी आणि सायकलपटू. गायकवाडांनी दक्षिण आशियाई सायकलींग स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. गायकवाडांच्या अथक प्रयत्नातून या संग्रहातील प्रत्येक सायकल आजही चालत्या अवस्थेत आहे.
सायकली जमवता जमवता विक्रम यांच्या संग्रहात लहान मुलांच्या तीन चाकी सायकल,
सायकलींचे विविध सुट्टे भाग, पेडल कार्स, कुलूपे,घड्याळे,रेडिओ, ग्रामोफोन,रेकॉर्ड प्लेअर,
टाईप रायटर,टेलिफोन, विविध आकारांच्या आणि रंगाच्या काचेच्या बाटल्या, अडकित्ते आणि पानाचे डबे जुनी वजने व मापे आणि अनेक घरगुती वस्तू यांचादेखील समावेश झाला आहे.