08/11/2017
कालचा रविवार सुरुवातीपासूनच मस्त गेला. गेल्या दोन कब्रा स्नेहभेटीमध्ये आपल्या कब्रा मंडळींनी पुढील कार्यक्रम म्हणजे एकदिवसीय सहलच का आयोजित करू नये असे सुचविले होते.त्यामुळे ही एकदिवसीय सहल सुरू होणार याचे विशेष औत्सुक्य होते. आपण म्हणतोच कब्रा स्नेहभेट परिवार ,त्यामुळे भेटलो की तसेच घरातल्यासारखे वातावरण भासत राहते. सर्वांचाच उत्स्फूर्त प्रतिसाद होता त्याचा विशेष आनंद वाटत होता.
सकाळी ठीक ८ च्या सुमारास आम्ही सर्वांनी वेल्हेकडे कूच केले. ग्रुपमधील सर्वच जण आधीच्या स्नेहभेटीमुळे परिचित होते त्यामुळे प्रत्येकाचा हरहुन्नरीपणा सुरुवात व्हायला वेळ लागला नाही.खडकवासलामार्गे जाण्याचा आमचा मार्ग होता. प्रवास जेमतेम एक सव्वा तासाचा असल्याने विशेष काही त्रासिक नव्हते. साधारण १० च्या सुमारास आम्ही सर्वजण एमरल्ड हट येथे पोहोचलो. तिथे पोहोचल्यावर तेथील सर्वेसर्वा श्री कालेकर यांनी अगदी घरच्यासारखे स्वागत केले.
थंड वातावरणामुळे कडकडून भूक लागली होती ,न्याहारीला दडपे पोहे आणि चहा अशी व्यवस्था होती. दडपे पोहे आणि कऱ्हाडे हे म्हणजे अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे .त्यामुळे 'फ्रेश 'होऊन सर्वांनी यथावकाश त्यावर ताव मारला. यासहलीबद्दल इतकी आत्मीयता होती की मुंबई ,रत्नागिरीवरून आपले मित्र आले होते. जमेल तसे प्रत्येक जण सेल्फी ,फोटो घेत होता.
थोडावेळ तिथल्या परिसरात सर्वांनी फेरफटका मारला . छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे तोरण जेथे बांधले ,तो तोरणा किल्ला आम्हाला सारखा समोर खुणावत होता. तेथील झुंजार माची आणि बुधला माची पाहून मला तर आताच ही मोहीम करूया का असे वाटत होते. सर्वांनाच तेथील निसर्गरम्य परिसर आवडला.
एकदिवसीय सहल असल्याने वेळ तुलनेने मर्यादित होता त्यामुळे विश्रांती वगैरे न घेता ,सर्व सहभागी कब्रा मित्र- मैत्रिणीची ओळखपरेड सुरू झाली. यावेळेला ओळखपरेड म्हणजे नुसतं नाव गाव पत्ता ,असे न करता ,त्या व्यक्तीस जितका वेळ पाहिजे तितका वेळ बोलण्याची मुभा होती. असे करता करता दुपारचे दीड वाजले ,तोपर्यंत जेवण तयार आहेची वर्दी मिळाली.सपाटून भूक लागलीच होती , सर्वजण जेवणात रंगून गेले.जेवणात झुणका ,भाकरी पोळी ,गावरान हिरव्या मिरचीचा ठेचा ,कोशिंबीर ,सॅलड, वांग्याची भाजी, भात ,आमटी ,दही ,ताक असा वैविध्यपूर्ण फक्कड बेत होता.
जेवण झाल्यावर वेळ मर्यादित असल्याने सर्वजण पुन्हा एकत्र जमले ,विविध विषयांवर चर्चा झाल्यावर आमचा मोर्चा अंताक्षरीकडे वळला. साधारण तासभर यातच व्यस्त होते सर्वजण .दुपारच्या चहाची वेळ झाली होती ,चहा होईपर्यंत ४.३० झालेच होते. इतका वेळ भुरर्कन निघून गेला ,कळलंच नाही. परतीकडे डोळे लागले होते पण तेथून पाय मात्र कुणाचाच निघत नव्हता. नन्तर पुन्हा एकदा पुढील कार्यक्रमावर ढोबळ चर्चा करून ,एक ग्रुप फोटो घेतला आणि नसरापूरमार्गे मजल दरमजल करीत आम्ही पुण्यास पोहोचलो. सर्वांच्याच मनात अशाच काहीशा भावना ,असेच काहीसे प्रवासवर्णन असेल ,मी ते फक्त मांडण्याचा प्रयत्न केला.सर्वांच्याच वतीने !
अशा रीतीने ही सहल साठवणीतील आठवण म्हणून नोंद करण्याजोगी झाली.
|| प्र.साद'र ||
प्रसाद घाटे
|| कब्रा स्नेहभेट परिवार ||
०६.११.२०१७