10/04/2025
आनंदी प्रवासासाठी सर्वोत्तम गुंतवणूक, एसटीए हॉलिडेज!
हॅलो ऑल! कसे आहात सगळे? मजेत ना? आणि सगळ्यांत महत्त्वाचा प्रश्न, हिंडताय ना? आयुष्यात सगळ्यात महत्त्वाचा आहे प्रवास! तो करत राहिलं पाहिजे आणि तोही उत्तम पद्धतीने! याच विषयावर तुमच्याशी बोलण्यासाठी पुन्हा एकदा या लेखनाचा प्रपंच करत आहे. खरं म्हणजे मी भ्रमंती करणारा माणूस आहे. हे एका जागी बसून लिखाण वगैरे करणं हा माझा प्रांत नाही; पण तुमच्यासारखे अनेक पर्यटक रोजच माझ्या संपर्कात येतात. त्यांच्याशी बोलणे होते, विचारांची देवाणघेवाण होते आणि त्यातूनच फिरण्याविषयी अजूनही लोकांना जागे करण्याची गरज आहे हे लक्षात येते.
विषयाला हात घालण्यापूर्वी तुम्हा सगळ्या पर्यटकांना माझा एक प्रश्न आहे. तुम्हाला तुमचा सगळ्यांत पहिला प्रवास आठवतो का? कदाचित काहींना आठवत असेल किंवा काहींना थोड्या मोठ्या, कळत्या बालपणातील प्रवास आठवत असेल. काही भाग्यवंतांचा पहिला प्रवासाचं अगदी शाही थाटात विमानाने किंवा रेल्वेच्या फर्स्ट क्लासमधून झालेला असेल; तर काहींचा एसटीच्या गर्दीतून घामाने निथळत, काहींचा रेल्वेचा, तर काहींचा खाजगी गाडीने झालेला असेल. कुणाचा मज्जा म्हणून फिरायला जाण्यासाठी झालेला प्रवास असेल, कुणी नातेवाईकांकडे गेले असतील, कुणी शाळेला सुट्ट्या लागल्यावर मामाच्या गावाला जाऊन आले असतील. प्रवास कसाही आणि कोणत्याही कारणाने झाला असला तरी त्याच्या आठवणी आजही पुसल्या गेल्या नसणार. घरापासून दूर वेगळ्या ठिकाणी जाण्यातली एक्साइटमेंट, तिथे गेल्यावर केलेली धमाल, प्रवासात खाल्लेला खाऊ, गप्पा, गाणी सगळं आजही नक्कीच तुमच्या लक्षात असेल. अशा लहानमोठ्या प्रवासांनी आपल्या एकसुरी जगण्यात मजेचे रंग भरले जातात. लहान मुलांच्या भावविश्वातही "झुक झुक झुक झुक आगीनगाडी", "हे विमान फिरते अधांतरी" किंवा "या वाऱ्याच्या बसून विमानी सहल करूया गगनाची" अशी स्वप्नातल्या भ्रमंतीची गाणी पिढ्यानपिढ्या म्हटली, ऐकली जातात. कारण, मुळातच प्रवास हे सगळ्यांच्याच आनंदाचे निधान असते. त्यात असतो एक हवाहवासा बदल, रोजच्या कंटाळ्याला एक आनंदी उत्तर.
लहान वयात आपण आईबाबांचं, मोठ्या वयाच्या नातेवाईकांचं बोट धरून प्रवास करतो. त्यांच्या सुरक्षित ढालीआडून नव्या गोष्टी टिपत राहतो, बघत राहतो, काही ना काही नवीन शिकत जातो. शाळेच्या सहली एन्जॉय करतो. त्यावेळी घरची माणसे सोबत नसली तरी सवंगडी असतात, शिक्षक असतात. या सहलींमध्ये आपण थोडेसे जबाबदार होतो, आपली आपण काळजी घ्यायचा प्रयत्न करतो. धीटपणे वागतो. पुढे समर कॅम्प्स, स्टडी टूर्स, ट्रेकिंग, कॅम्पिंग अशी आपली भटकंतीची कक्षा रुंदावते. पुढे कदाचित नोकरी उद्योगाच्या निमित्ताने फिरणे व्हायला लागते. लग्नानंतर रोमँटिक अशी हनिमून टूर, जोडीदाराबरोबर उगाच किंवा कारणानिमित्ताने केलेली भटकंती, प्रौढ वयात मुलाबाळांसह केला जाणारा प्रवास ते खास ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या टूर्स असा प्रवास सुरूच राहतो. वाढत्या वयाबरोबर या प्रवासाचे स्वरूप बदलत जाते, त्याची कारणे बदलतात, साधने बदलतात, प्रवासातले सोबतीची बदलत जातात. फक्त एक गोष्ट बदलत नाही! ती म्हणजे प्रवासाचा आनंद, त्यामुळे आयुष्याला येणारी रंगत, जमा होणारे अनुभव आणि गाठीशी साचत जाणारं शहाणपण. लौकिकार्थाने वयाच्या एका टप्प्यावर आपण शिक्षण पूर्ण करतो, पण आयुष्य दरक्षणी काहीतरी नवीन शिकवत असतं आणि आयुष्याच्या या शाळेतला सर्वांत महत्त्वाचा गुरु असतो प्रवास, भटकंती!
आपण एकदा एखाद्याला गुरू मानलं तर त्याच्याकडून धडे हे मिळणारच. फक्त हे धडे आनंदाचे असावेत की शिक्षा करून मिळालेले याची निवड आपल्याला करायची आहे. 'फिरण्याविषयी बोलू काही' या नावाने मी मागे एक पुस्तक प्रकाशित केले होते. एक पर्यटन व्यावसायिक म्हणून मला आलेल्या विविध अनुभवांनी मला जे शिकवले, जे अनुभव दिले ते मी तुम्हा सर्वांसाठी त्यांत मांडले होते. ते पुस्तक वाचून अनेकांनी त्याबद्दल माझे आभार मानले. पर्यटन का करायचे आणि ते करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची हे अनेकांना त्यातून शिकायला मिळाले. एक नवी दृष्टी मिळाली, असेही त्यांनी सांगितले. या सगळ्या सकारात्मक प्रतिक्रियांमध्ये एक प्रतिक्रिया अशीही होती की इतकी सगळी खबरदारी घ्यायची म्हणजे वेगळाच ताण येणार. मग प्रवासाने, भटकंतीने ताण तणाव कमी कसा होणार? आणि मग अशा प्रवासाचा फायदाच काय?
या प्रश्नाचं उत्तर तुमचं तुम्हालाच मिळावं म्हणून तर आज तुम्हाला तुमच्या आयुष्यातला सगळ्यांत पहिला प्रवास आठवायला सांगितला. आज कित्येक वर्षांनंतर तुमच्यापैकी बहुतेकांना त्या प्रवासात काय त्रास झाला होता, त्यापेक्षा तुम्ही त्यावेळी काय धमाल केली होती तेच आधी आठवलं असणार. बरोबर ना? हीच तर प्रवासाची ताकद आहे. तुमच्या मनाची, विचारांची, आठवणींची सकारात्मक बाजू उजळून निघावी आणि काही कमीजास्त असेल, चुकलं असेल, त्रास झाला असेल तर ते विस्मरणात जावं ही किमया भटकंती घडवत असते. तोच प्रवास जर तुम्हाला पुन्हा करायचा असेल, तर तुम्ही पूर्वी झालेल्या चुका नक्कीच टाळाल, पण आनंद अबाधित ठेवाल. आता, जेव्हा काळ बदलला आहे, तुमच्या हाती निर्णय आहेत तर फिरस्तीसारख्या आयुष्य सुंदर बनवणाऱ्या गोष्टींबद्दल चुकीचे निर्णय का घ्यायचे? या बाबतीत जितका अचूक निर्णय आणि जितकी योग्य निवड तितका तुमचा आनंद अधिक, हे विसरून चालणार नाही.
आपला प्रवास, सहल आनंददायी, सुरळीत आणि सुरक्षित व्हायला हवी असेल तर त्यासाठी आपला ट्रॅव्हल पार्टनर किंवा आपण निवडलेली टूर कंपनी उत्तमच असायला हवी. उत्तम कंपनी म्हणजे केवळ मोठे नाव असलेला ब्रँड नव्हे, तर खरोखरच प्रवासाच्या सर्व बाजू समजून घेऊन प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीची काटेकोर काळजी घेणारी कंपनी. या निकषावर एसटीए हॉलिडेज तंतोतंत उतरते हे मी अभिमानाने सांगेन. माझ्या प्रत्येक टूरबरोबर कोणत्या वयोगटातील पर्यटक आहेत, त्यांनी कोणते डेस्टिनेशन निवडले आहे, त्यांना तिथे काय करायला आवडेल किंवा आनंदाने एन्जॉय करता येईल, त्यांचा प्रथेक मुक्काम अधिकाधिक आरामदायक कसा होईल, प्रवास स्मूथ कसा होईल आणि त्यांनी निवडलेल्या टूरचा प्रत्येक क्षण एन्जॉयेबल कसा करता येईल याची संपूर्ण काळजी आम्ही घेतो. प्रत्येक टूर आखणाऱ्या आमच्या प्रॉडक्शन डिझायनरपासून ते टूरसोबत प्रत्येक पर्यटकांची काळजी घेणाऱ्या टूर लीडरपर्यंत प्रत्येकाची यामागे मेहनत असते. म्हणूनच भारतभरातील टूर्सबरोबरच आज एसटीए हॉलिडेज इंटरनॅशनल टूर्ससाठीही एक विश्वासार्ह ब्रँड बनला आहे. साऊथ ईस्ट एशिया स्पेशालिस्ट म्हणून पर्यटकांना आमचा परिचय आहेच, पण वेगवेगळ्या कॉम्बो टूर्स सादर करून भटकंतीमधील नावीन्य आणि चैतन्य टिकवत किफायतशीर घडवणारी कंपनी म्हणूनही एसटीएने ओळख मिळवली आहे.
आपण जन्मभर अनेक कारणांनी प्रवास करत असतो. व्यवसाय, तीर्थयात्रा, कौटुंबिक कारणे किंवा निव्वळ पर्यटनाचा आनंद असे कुठलेही कारण त्यामागे असू शकते. मात्र कोणत्याही कारणाने केलेला प्रवास कधीच फक्त एखाद्या ठिकाणी जाणे आणि तिथून परत येणे इतकाच मर्यादित राहत नाही. प्रवास आपल्याला नव्याने घडवतो, आपल्यातले काहीतरी प्रत्येक वेळी बदलते. आपण नव्याने काहीतरी शिकतो, प्रत्यक्ष ठिकाणचे काहीतरी आत्मसात करतो, नव्या अनुभवांना सामोरे जातो, नवीन माणसांना भेटतो, जगण्याची एक नवी पद्धत पाहतो. नवे पदार्थ, त्या त्या प्रांताची वेशभूषा, भाषा, राहणीमान, बोलण्याचालण्याच्या पद्धती आणि या सगळ्यांनी मिळून तयार होणारी त्या ठिकाणाची संस्कृती हे आपण कळत नकळत अनुभवत असतो. एखादे प्रेक्षणीय ठिकाण पाहताना त्यामागच्या कथा,दंतकथा ऐकतो, इतिहास जाणून घेतो, तिथे आलेल्या इतर लोकांशी सहज संवाद साधला जातो. आपल्याही नकळत या गोष्टींचा आपल्या व्यक्तिमत्त्वावर परिणाम होत असतो. जास्त प्रवास केलेली व्यक्ती नेहमीच अनुभवसंपन्न असते, बहुश्रुत असते आणि तिच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव सगळ्यांवर पडतो. घोकंपट्टी न करता आपल्या व्यावहारिक ज्ञानाच्या कक्षा वाढवण्याचे उत्तम साधन म्हणजे पर्यटन.
प्रवास किंवा पर्यटन करण्यामुळे ज्ञानात भर पडते हे काही आजचे शहाणपण नाही. आपण कोणत्याही संतांच्या गोष्टी ऐकल्या तरी त्यांनी भरपूर प्रवास केल्याचे आढळते. कोणत्याही सोयीसुविधा नसताना जंगलांमधून, डोंगरदऱ्यांमधून पायी आसेतु हिमाचल देशाटन करणाऱ्या अनेक संतांच्या, समाजसुधारकांच्या कथा तुम्ही ऐकल्या असतील. पर्यटन आपल्याला फक्त आनंद देत नाही, तर एक माणूस म्हणून आपल्याला अधिक समृद्ध करते हे काळाच्या कसोटीवर सिद्ध झालेले सत्य आहे.
इन्व्हेस्टमेंट्स आणि रिटर्न्स हे आज सर्वसामान्य माणसांसाठीही परवलीचे शब्द झाले आहेत. आपण हे शब्द सहसा आर्थिक गुंतवणुकीबाबत वापरतो. किती रक्कम कुठे, कशा प्रकारे गुंतवली की त्यावर कधी, कसा परतावा मिळेल आणि आपली गुंतवणूक किती लाभ देईल हे नीट तपासून पाहून मगच आपण गुंतवणूक करतो. या अर्थाने विचार करायचा झाला तर पर्यटन ही देखील एक गुंतवणूकच नाही का? आपण यामध्ये पैशांसोबतच आपल्या आशा अपेक्षा, स्वप्ने, आणि काही दिवसांचा वेळ या सगळ्यांचीच गुंतवणूक करत असतो. या गुंतवणुकीतून आपल्याला आणखी पैशांची नाही तर आनंद, ताणतणावातून मुक्ती, रुटीनमधून बदल, निसर्गाच्या सान्निध्यात किंवा आपल्या आवडत्या डेस्टिनेशनवर भ्रमंतीचा आनंदी अनुभव, कुटुंबासोबत घालवलेले अविस्मरणीय क्षण अशा परताव्याची अपेक्षा असते. त्याबरोबरच येतो आपल्याला मिळालेली नवी माहिती, नवी मित्रमंडळी हा बोनस. कोणत्यातरी कसलीही विश्वासार्हता नसलेल्या ट्रॅव्हल कंपनीकडे तुम्ही ही गुंतवणूक कराल का? मनःस्ताप, प्रवासातील अडचणींमुळे वाढलेला ताण, सुंदर प्रवासाच्या स्वप्नाचा चक्काचूर आणि वाया गेलेले पैसे अशा परताव्याची तुम्ही तयार आहेत का? या प्रश्नांची उत्तरे नकारार्थी असतील तर कोणत्याही टूरचा प्लॅन करण्यापूर्वी तुमचे डेस्टिनेशन आहे एसटीए हॉलिडेज! इथून तुम्हाला तुमच्या प्रत्येक आवडत्या डेस्टिनेशनकडे नेणारा सर्वोत्तम मार्ग नक्कीच सापडेल!
उत्तम प्रवासासाठी नियोजन उत्तम असणे आवश्यक असते. झटपट आणि अचूक निर्णय घेण्याची क्षमता, आयत्या वेळी कोणत्याही कारणाने उद्भवलेल्या अडचणींवर मात करण्याची समयसूचकता आणि धीर, परिस्थितीनुसार योग्य ते बदल करणे हे सुद्धा करता यायला हवे. कारण, दरवेळी प्रत्येक गोष्ट पडेलच असे नाही. विशेषतः जिथे निसर्ग लहरी असतो, अशा ठिकाणच्या टूरदरम्यान या गोष्टींचे भान सतत राखावे लागते. ज्याला हे जमते, त्याचा प्रवास चांगला होणार यात काही शंका नाही. मात्र, आज आपण सगळेच आपापल्या कामात व्यग्र असतो. रोजच्या बिझी शेड्युलमधून वेळ काढून लहान सहान गोष्टी लक्षात घेत मोठ्या सहलींचे नियोजन करणे असे नाही. म्हणूनच आपण एखाद्या टूर कंपनी मार्फत प्रवासाचे नियोजन करण्यावर भर देतो. मग ती टूर कंपनी पुरेशी विश्वासार्ह, आपला आनंद जपणारी, आपल्या सुरक्षिततेची काळजी घेणारी आणि निव्वळ आपला फायदा करून न घेता पर्यटकांच्या पदरात त्यांच्या पैशांचं पुरेपूर मोल घालणारी असायला नको का? की तुम्ही केवळ काही पैसे वाचवण्यासाठी तुमच्या आनंदापेक्षा स्वतःची सोय पाहणारी, तुमची सुरक्षितता वाऱ्यावर सोडणारी आणि प्रत्येक बाबतीत तुम्हाला तडजोड करायला लावणारी कंपनी निवडणार? एक जागरूक पर्यटक अशी चूक कधीच करणार नाही. अशाच चोखंदळ आणि उत्तम तेच निवडणाऱ्या पर्यटकांसाठीच आहे एसटीए हॉलिडेज!
काही वेळा आमच्याकडे येणारे पर्यटक असा आक्षेप घेतात की आमच्या टूरच्या किमती जास्त वाटतात. पण, या गोष्टीला एकाच उत्तर आहे की सोनं सोन्याच्या किमतीतच विकलं जाणार! किंवा बदाम विकत घ्यायचे असतील तर फुटाण्याचं मोल देऊन कसं चालेल? एसटीएची प्रत्येक टूर अस्सल सोन्यासारखीच अनेक सुलाखून घेतलेली असते. म्हणूनच आमच्या टूरवर जाणाऱ्या प्रत्येक पर्यटकाचा चेहरा बावनकशी आनंदाने झळाळून उठल्याशिवाय राहत नाही. कोविडच्या काळ्या छायेनंतर पर्यटन क्षेत्रात पुन्हा एकदा तेजी दिसायला लागली. या वाहत्या गंगेत हात धुवून घेण्यासाठी अनेक हौशे नवशे पर्यटन व्यवसायात उतरले. आधीच सीझनपुरते दुकान थाटून पर्यटकांच्या माथ्यावर थातुरमातुर सहली मारणाऱ्या फेक टूर कंपन्या गल्लोगल्ली होत्याच. त्यात आता आणखी भर पडली आहे. भरमसाठ आश्वासने, भरपूर डिस्काऊंटचे आमिष पर्यटकांना दाखवले जाते. पर्यटकही सहज त्यांच्या जाळ्यात अडकतात. थोडे पैसे वाचवायचा त्यांना मोह पडतो आणि संपूर्ण टूर खराब व्हायची वेळ येते. कधी हॉटेल्स अतिशय सुमार, अगदी गावठी लॉज असावा तशी निघतात, कधी खाण्यापिण्याची व्यवस्था नसते, तर कधी प्रवासात अनंत अडथळे येतात. काही वेळा तर लोकल ट्रॅव्हल पार्टनर बोगस निघतात. अगदी परदेशात पोहचल्यावर तिथे धड गाईड नाही, धड ड्रायव्हर नाही अशा स्थितीत अडकलेल्या पर्यटकांच्या कहाण्या मला नावानिशी ठाऊक आहेत. प्रत्येक टूर कंपनी असे करत नाही, एसटीएप्रमाणेच उत्तम सेवा देणाऱ्या अनेक कंपन्या आहेत, पण आढीतला एक नासका आंबा संपूर्ण आढी खराब करतो म्हणूनच अशा नासक्या आंब्यांपासून सावध राहायला पाहिजे.
राहता राहिली खर्चाची गोष्ट, तर आपण खरंच याबाबतीत इतके काटेकोर आहोत? एकदा आपण सर्वांनी स्वतःला हा प्रश्न विचारला पाहिजे की आपण खरंच किरकोळ गोष्टींसाठी भरमसाठ खर्च करत नाही का? आपण मॉलमध्ये जातो, साध्याशा वास्तूसाठी सुद्धा दुप्पट तिप्पट किंमत मोजतो, एक सिनेमा पाहायचा झाला तर किमान हजारभर रुपये तरी खर्च होतात, पिझ्झा बर्गरची पार्टीसुद्धा दीड दोन हजारापर्यंत सहज जाते. विचार केला तर अशी पार्टी, खाण्यापिण्यातला आनंद एखाद्या सुंदर प्रवासाच्या आनंदापुढे क्षणिकच म्हणायला हवेत. तरीही आपण ते अगदी सहजपणे, हसत हसत करतो. ब्रँडेड कपडे, शूज, अगदी एक कप कॉफीसाठी दोनशे तीनशे रुपये आपण सहज खर्च करतो. अर्थात हे खर्च करण्यासाठी आपल्याकडे कारण असते, ते म्हणजे आपल्या आनंदासाठी खर्च करायचा नाही तर कशासाठी करायचा? आपला आनंद, आपलं स्टेटस यासाठी दररोजच्या जगण्यात आपण सढळहस्ते खर्च करतो. मग वर्षातून फार तर दोन तीन वेळा केली जाणारी टूर आपल्या, आपल्या कुटुंबाच्या आनंदासाठीच असते ना? त्याच वेळी आपण हात आखडता का घ्यायचा? शिवाय प्रत्येक प्रवास आपल्यासाठी आठवणींचा एक नवा कोलाज तयार करत असतो. मग या आठवणी सुंदरच असाव्यात ही आपलीच जबाबदारी नाही का? अशा सुंदर, रम्य आठवणी जपण्यासाठी तुम्हाला जपत टूर घडवून आणणाऱ्या एसटीए सारख्या कंपनीच्या हाती आपल्या प्रवासाची सूत्रे देणे नक्कीच शहाणपणाचे ठरेल, नाही का?
एसटीएने आपल्या व्यवसायाची सुरुवात पुण्यातून केली आहे. पुणेकर चोखंदळ, चिकित्सक आणि स्पष्टवक्ते म्हणून प्रसिद्ध आहेत. तेवढेच ते त्यांच्या पसंतीस उतरणाऱ्या गोष्टींवर भरभरून प्रेमही करतात. अगदी एखाद्या इडली किंवा मसाला डोसा देणाऱ्या रेस्टॉरंटपासून ते उत्तम सेवा देणाऱ्या कोणत्याही लहानशा जॉईंट पर्यंत पुणेकरांचे उदंड प्रेम अनुभवणारे अनेक व्यावसायिक आहेत. सुदैवाने एसटीए हॉलिडेजलाही पुणेकरांचे प्रेम लाभले आहे. म्हणूनच कोविडचा दीर्घ कालावधी उलटून गेल्यानंतरही आम्हांला पुणेकरांचा तोच विश्वास, तोच प्रतिसाद अनुभवता आला. पुण्यासारख्या शहरात सगळी आव्हाने पेलून एसटीए सहा सात वर्षे वाटचाल करत आहे ते याच प्रेमाच्या आणि विश्वासाच्या बळावर. आजही सीझनच्या सगळ्या टूर्स भरून जात आहेत आणि या प्रेमाबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. अर्थातच सुरुवातीच्या काळात आमच्यातही काही कमतरता होत्या, उत्साहाच्या भरात कदाचित आम्हीही काही चुका केल्या, पण वेळीच आम्ही आमच्यात सकारात्मक बदल घडवण्यावर भर दिला. पर्यटकांकडून वेळोवेळी आलेल्या सूचनांनुसार आम्ही आमच्या सेवांमध्ये सुधारणा करत गेलो. पर्यटनाचा व्यवसाय म्हणजे रोजचा दिवस नवा, रोजची आव्हाने नवी आणि रोजचे अनुभव नवे. रोजच या आव्हानांना सामोरे जात आम्ही घडलो आहोत, घडत आहोत. पण, या सगळ्यांत आमच्या पर्यटकांना झळ पोहचू न देण्याचा वस एसटीएने कसोशीने पाळला आहे. म्हणूनच आमचे पर्यटक आमच्यावर १०० टक्के विश्वास ठेवतात. तुम्हीही तुमच्या आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावरची तुमची आवडती टूर एकदा एसटीएकडे बुक करा, आणि तुम्ही स्वखुशीने आमचे लाईफ मेंबर व्हाल. तुमच्या आनंदात भर घालणारी प्रत्येक टूर आमच्याकडेच बुक कराल.
आता एक छोटीशीच बाब सांगतो. आपण नेहमी जीवनप्रवास असा एक शब्द वापरतो किंवा अनेक ठिकाणी वाचतो. म्हणजेच माणसाच्या जन्मापासून शेवटपर्यंतच्या काळाला एका प्रवासाची उपमा दिली जाते. या काळाच्या प्रवासात सामील झालेलो असतानाच आपणही अनेक छोट्या मोठ्या प्रवासाची स्वप्ने बाळगलेली असतात. आपले आयुष्य त्याच्या गतीने पुढे चालतच असते. त्याच्या गतीशी जुळवून घेत आपणही धावत राहतो. आपली प्रवासाची स्वप्ने त्या मोठ्या प्रवासातील लहानशा आनंदी थांब्यासारखी असतात. आयुष्य आपली गती थांबवत नाही, मात्र हे असे स्वप्नांचे थांबे त्याचा मार्ग किंचित काळासाठी बदलून एक सुखाचा विसावा बनतात. आपली सगळ्यांची एक ना एक तरी ड्रीम टूर असते. बऱ्याचदा ती खूप खर्चिक असते म्हणूनच ती प्रत्यक्षात उतरणे लांबणीवर पडत जाते किंवा असं म्हणूया की आपण ती लांबणीवर टाकतो. प्रत्यक्ष वेळी आपण इतर गोष्टींना प्राधान्य देतो आणि आपली ड्रीम टूर कधी पूर्ण होणार म्हणून झुरत राहतो. प्रायॉरिटीज बदलत राहतात आणि आपले स्वप्न स्वप्नच राहते. काळ पुढे जात राहतो तशी आपल्या स्वप्नाची किंमतही वाढत जाते आणि आपण आणखीनच झुरत राहतो. असेच होत राहिले तर...
"ख्वाब सामने ही थे मगर देखे न गये
राहों की पुकारे पीछे छोड आये
यूं तरसते रहें उम्रभर हम
कि अपना ही साथ ना दे पाये ... "
अशी निराशा आपल्याही वाट्याला येऊ शकते. पण आपली स्वप्ने साकारण्यासाठी प्रयत्न करणे आपल्याच हातात असते. खर्चाची भीती बाळगत राहिलो तर इतर ठिकाणी वाढ्तणाऱ्या महागाईबरोबर टूर देखील महाग होत जाणार आहे. शिवाय फक्त आपली ठराविक लाइफस्टाईल मेंटेन करण्यासाठी आपण रोज कितीतरी अनावश्यक खर्च करत असतोच कि. त्याचा विचार केला तर आपले स्वप्न जगण्यासाठी केलेला खर्च अनाठायी कसा ठरेल? स्वप्नपूर्तीचा आनंद आणि समाधान यांची किंमत कोण ठरवणार? आपण आपली ड्रीम टूर अशीच लांबणीवर टाकत राहिलो तर आपला आनंदही दूर जात राहील आणि सरत्या काळाबरोबर आपले शरीरही थकत जाणार हे लक्षात घ्यायला हवे. आपण जोवर फिरण्याची मजा सक्षमतेने लुटू शकतो तोपर्यंतच प्रवासाचा आनंद आहे.
तरीही तुम्हाला वाटत असेल की तुमची ड्रीम टूर तुम्ही आताच करू शकत नाही आहात, मग कारण पैशांचे असो, वेळेचे असो किंवा अन्य काही जबाबदाऱ्यांचे; तरीही तुम्ही लहानमोठ्या इतर टूर्सचा आनंद नक्कीच घेऊ शकता. असं म्हणतात की लॉ ऑफ अट्रॅक्शन सृष्टीत कार्यरत असतो. तुम्ही जी गोष्ट मनापासून करत राहाल ती अनेक पटीने तुमच्याकडे परत येते. म्हणूनच तुमच्या आवडत्या टूरसाठी झुरत राहू नका. छोट्या छोट्या प्रवासाचा आनंद घेत राहा आणि एक दिवस तुम्ही तुमचे स्वप्न नक्कीच प्रत्यक्षात आणाल.
तुमच्या स्वप्नातल्या टूरसाठी एक निश्चित तारीख, वेळ ठरवून त्यादृष्टीने प्लॅनिंग करणे हा देखील एक उत्तम उपाय ठरू शकतो. नुसतेच 'आता नको, नंतर पाहू'
असे म्हणत राहिलात तर ती नंतरची वेळ कधीच येणार नाही. त्यापेक्षा एक डेडलाईन ठरवून घ्या. वाढत्या महागाईच्या अंदाजाने टूरची संभाव्य किंमत काय असेल त्यानुसार बजेटही ठरवा. आणि व्यवसायातील, नोकरीतील एखाद्या टार्गेटचा पाठपुरावा करता, त्याच इंटेन्सिटीने या टार्गेटचाही पाठपुरावा करा. दरमहा त्यासाठी काही रक्कम बाजूला ठेवा. तुमच्या इतर जबाबदाऱ्यांचे नियोजन करा. तुम्ही प्रवासाला निघाला आहात अशा खात्रीने सगळी तयारी करायला घ्या आणि एक दिवस खरोखरच तुम्ही तुमच्या आनंदाच्या वाटेवर असाल. बघा प्रयत्न करून. बाकी तुमच्या स्वप्नपूर्तीचा मार्गात आम्ही आहोतच तुमचे भक्कम आणि विश्वासू साथीदार म्हणून!! मग कधी निघताय या आनंदयात्रेसाठी??