09/05/2026
#भूतान: आनंदी देश
भूतान हा देश प्राचीन काळापासून रहस्यमय आणि पौराणिक कथांची पार्श्वभूमी असलेला देश आहे. हिमालयातील नयनरम्य दृश्य, शांततेचे प्रतीक असणारे बौद्ध मठ यामुळे भूतान एक आनंदाची,मनःशांतीची उधळण करणारा देश आहे!
निसर्गाच्या सानिध्यात जो आनंद मिळतो तो इतर कुठेही मिळणार नाही... निसर्गाच्या जवळ गेलो की आपण रिफ्रेश होतो, नव्या उत्साहाने आयुष्य जगतो...निसर्ग भरभरून देतो...आनंदी रहायला शिकवतो...
भूतान ला 'land of the thunder dragon' असंही म्हटलं जातं
भूतानमधील आवर्जून बघावीत अशी काही स्थळे :-
थिम्पू :- भूतानच्या मध्य पश्चिम भागात वसलेलं हे शहर म्हणजे भुतानची राजधानी! भूतानचा सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या या शहरात बुद्ध डोरदेन्मा सारख्या वास्तू आहेत. टेक्सटाईल म्युझियम, लायब्ररी, आर्ट स्कुल आणि शॉपिंगसाठी विकेंड मार्केट... निसर्गाच्या सहवासात तुम्ही शॉपिंगचाही आनंद मनमुरादपणे येथे लुटू शकता. राजधानीचे शहर असून सुद्धा इतर देशांच्या राजधानी मध्ये असलेली गर्दी आणि लगबग इथे तुम्हाला दिसणार नाही. भुतान च्या लोकांचा मूळ स्वभावच शांत व संयमी असल्याने येथे तुम्हाला दैनंदिन उपक्रम संथ असल्यासारखे वाटतील.
पुनाखा - थिंपू पासून 75 किलोमीटर अंतरावर पुनाखा हे शहर फो चू आणि मो चू या नद्यांच्या संगमावर वसलेले छोटेखानी शहर आहे. भूतान मध्ये फिरताना आपल्याला गोम्पा आणि झोंग हे शब्द नेहमी ऐकायला मिळतात. गोम्पा म्हणजे तिबेटन मंदिर किंवा बुद्धिस्ट मॉनेस्टरी आणि झोंग म्हणजे किल्ला. भूतान मधील स्थलदर्शनामध्ये आपल्याला बरेच असे गोम्पा झोंग आणि स्तूप पाहायला मिळतात. पुनाखाझोंग फो चू आणि मो चू या दोन नद्यांच्या संगमावर वसलेले एक सुंदर ठिकाण आहे.
भूतान मध्ये वर्षभर काही ना काही फेस्टिवल सुरू असतात. हे फेस्टिवल प्रामुख्याने विविध प्रकारचे रंगबिरंगी व पारंपारिक कपडे परिधान करून व चेहऱ्यावर वेगवेगळे मुखवटे घालून, ढोल वाजवून नृत्य व संगीताच्या माध्यमातून साजरे केले जातात. पुनाखा फेस्टिवल हा मार्च महिन्या मध्ये साजरा केला जातो.
पारो शहर :- खरं तर पारो हे शहर भूतान मधील एक छोटे शहर आहे पण या शहरात असलेली 155 मंदिरे आणि बुद्धिस्ट मठ जगभरातल्या लाखो पर्यटकांना आकर्षित करत असतात. यातील बरेचसे मठ हे चौदाव्या शतकातील आहेत. भूतान म्हटले की उंच डोंगरावरील व डोंगराच्या कडेवरील वसवलेले तकसांग मॉनेस्टरी किंवा टायगर नेस्ट याचे चित्र आपण सर्व पर्यटन कंपन्यांच्या जाहिरातीमध्ये नक्कीच बघतो. पारो मधील असलेले हे ठिकाण बघण्यासाठी आपल्याला साधारण दोन ते तीन तास पायी ट्रेक करून जावे लागते.
भूतान मध्ये रस्त्याने प्रवास करताना आपल्याला बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या रंगाचे झेंडे लावलेले पाहायला मिळतात. प्रत्येक रंगाच्या झेंड्याचा अर्थ व प्रयोजन वेगवेगळे आहे. यातील काही झेंडे हे धार्मिक मंत्र व प्रार्थनेचे असतात. पांढरा झेंडा वायूतत्व व चांगल्या भविष्यासाठी, निळा झेंडा आकाश तत्व व चांगल्या आरोग्यासाठी, पिवळा झेंडा अडथळ्यांवर विजय मिळवण्यासाठी, हिरवा झेंडा दया व क्षमा साठी, लाल झेंडा इच्छापूर्तीचे प्रतीक असे मानले जाते. यामध्ये अर्थ जरी वेगवेगळे असले तरी या झेंड्यांना बघून आपली क्षणिक करमणूक होते.
फुंटशोलिंग:- भारत व भूतान या देशांच्या सीमेवर असलेले व जिथून आपण भूतान मध्ये प्रवेश करतो ते ठिकाण म्हणजे फुंटशोलिंग. म्हणून याला पण भूतानचे प्रवेशद्वारेच म्हणूया. भारतामधील सीमेवरील गाव हे जयगाव या नावाने तर भूतान मधील सीमेवरील गाव हे फुंटशोलिंग या नावाने ओळखले जाते. भूतानचा भारता बरोबरील बराचसा व्यापार याच शहरातून केला जातो. भूतानचं महत्त्वाचं आर्थिक केंद्र असणारं हे शहर तिथल्या इतर शहरांसारखेच नैसर्गिक सौंदर्याने नटलेलं आहे.
याशिवाय, टायगर नेस्ट, सिमतोखा जोंग, बुद्ध केंद्र, प्राणिसंग्रहालय, चिमी लखांग मंदिर यांसारख्या स्थळांना तुम्ही भेट देऊ शकतात...याशिवाय, भूतान देशाची काही वैशिष्ट्ये म्हणजे - (भूतान का बघाल?)
हा देश आर्थिकदृष्ट्या फारसा पुढारलेला नसला तरी जगातील सर्वात आनंदी देश म्हणून भूतान ची नोंद आहे.
हानिकारक असा कार्बन वायू नसलेला जगातला एकमेव देश म्हणून भूतान ओळखला जातो.
जगभरात सर्वात जास्त जंगले असलेला देश आहे.
ट्रॅफिक लाईट, रेल्वे, एअरफोर्स, नेव्ही यांसारख्या सुविधा भूतान मध्ये नाहीत
रविवारी येथील लोक वर्तमानपत्र वाचत नाहीत. या आणि अशा अनेक गमती-जमती भूतानची सफर करत असताना अनुभवता येतात...
भारत आणि भूतान यांचे संबंध हे खूप गाढ आणि सौहार्दाचे आहेत. रॉयल भूतान आर्मी मधील अधिकारी यांचे ट्रेनिंग भारतामधील एनडीए आणि आयएमए यासारख्या संस्थांमधून आजही दिले जाते.
भूतान ला जाण्यासाठी सर्वोत्तम वेळ :- तुम्ही वर्षभरात केव्हाही भूतान ला जाऊ शकतात. पण, मार्च ते जुलै आणि सप्टेंबर-नोव्हेंबर हा कालखंड भूतान फिरण्यासाठी सर्वोत्तम कालखंड आहे. याच दिवसात तेथील "मुखवटा नृत्य महोत्सव" बघण्यासाठी मोठ्या संख्येने जगभरातील लोकं येतात.
कसे जाणार, बजेट किती असणार?
भूतान ला जाण्यासाठी तुम्ही ट्रेन किंवा फ्लाईट चा उपयोग करू शकता, जवळचे रेल्वे स्टेशन न्यू जलपायगुरी किंवा हसीमारा तर जवळचे एअरपोर्ट हे बागदोगरा हे आहे. भारतामधून भूतानला पारोला जाणारी थेट विमानसेवा बऱ्याच वेळा बंद किंवा खंडित असते आणि खूप महाग सुद्धा असते.
फ्लाईट ने जाण्याचा विचार केला तर 65 ते 70 हजारापर्यंत तुमची आलिशान आणि आनंददायी भूतान ट्रिप संपन्न होऊ शकते...
सुंदर आणि मनमोहक असे निसर्गसौंदर्य लाभलेला भूतान हा देश डोंगररांगांमध्ये वसला आहे. आर्थिक दृष्टीने फारसा पुढारलेला नसला तरी सगळ्यात आनंदी देश म्हणून हा देश ओळखला जातो याचे कारण या देशाची जीवनशैली! भूतानच्या आनंदी असण्याच्या रहस्याचा शोध आणि तिथल्या निसर्गरम्य स्थानांचा आनंद घेण्यासाठी एकदा भूतानची ट्रिप नक्की अनुभवा...
स्वदेस टूर्स अँड ट्रॅव्हल्स सोबत आजच तुमची भूतान ट्रिप बुक करा आणि एका आनंददायी देशाची सफर आनंदाने करा... भूतानच्या निसर्गाचा दिलखुलास आनंद घेऊ शकता कारण तिथलं वातावरण आणि निसर्ग या महिन्यात खूप उत्साहवर्धक आणि आल्हाददायी असते!
अधिक माहितीसाठी आमच्या प्रतिनिधींशी आजच संपर्क करा...
स्वदेस टूर्स
नीलम मंडलिक