18/02/2023
राजवाडी-ब्राह्मणवाडीतल्या ग्रामस्थांनी एकत्र येऊन सुरू केलेल्या 'निसर्ग वारी' या पर्यटन उपक्रमाला गेल्या चार महिन्यांत निरनिराळ्या थरातल्या दोनशेहून जास्त व्यक्ती किंवा गटांनी भेट दिली. यापैकी कित्येकांनी इथल्या अतिशय निसर्गरम्य परिसरात मुक्कामही केला आहे . पण गेल्या मंगळवार-बुधवारी सुमारे २०-२२ वेगळेच 'बालपाहुणे' इथे येऊन वातावरण प्रफुल्लित करून गेले.
ख्यातनाम समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांच्या लोकबिरादरी प्रकल्पातर्फे गडचिरोली जिल्ह्यातील नेलगुंडा येथे चालवण्यात येणाऱ्या साधना विद्यालयाचे हे विद्यार्थी-विद्यार्थिनी. आपल्या शिक्षकांसह त्यांनी दोन दिवस इथे मुक्काम केला.
गडचिरोलीच्या आदिवासी भागात गावपातळीवरचं नैसर्गिक जीवन जगत असलेली ही मुलं बोलण्या-वागण्यात मात्र अतिशय चुणचुणीत होती. गाणं म्हणा, असं सांगितलं की, न लाजता पटकन 'हीच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे..' एका सुरात सुरु करायची. ( आणखी एक गंमतीचा भाग म्हणजे, या मुलांचं शाळेत सर्व शिक्षण इंग्लिश माध्यमातून होतं. त्यामुळे ते एक तर त्यांच्या माडिया बोली भाषेत बोलतात, नाही तर थेट मोडक्या इंग्लिशमध्ये. मराठी भाषा त्यांना जवळपास समजतच नाही.) प्रत्येकाच्या घरी मात्र १०-१५ गाई-म्हशी. (अर्थात त्यातल्या दुभत्या कमीच.) पण ती त्यांची जीवनशैली आहे. शिवाय, वन्यजीवांचा सहवासही आहेच.
या मुक्कामात सकाळी ही मुलं नैसर्गिक गरम पाण्याच्या तलावात मनसोक्त डुंबली. त्यानंतर संगमेश्वर येथील कर्णेश्वर मंदिराला भेट दिली आणि पैसा फंड हायस्कूलमध्ये जाऊन तिथली शैक्षणिक कार्यपध्दती समजावून घेतली. या शाळेचे कलाशिक्षक जे. डी. पराडकर यांच्या नेतृत्वाखाली माजी विद्यार्थ्यांनी उभं केलेलं कला दालन पाहिलं. दुपारी धामणी येथील 'ड्राइव्ह इन'मध्ये अमोल लोध यांच्या सौजन्याने चवदार 'पोटोबा' झाल्यानंतर राजवाडीत येऊन प्राचीन सोमेश्वर मंदिर आणि नदीतल्या नैसर्गिक गरम पाण्याच्या उच्छवासांचा अनोखा अनुभव या मुलांनी घेतला. संध्याकाळी आयोजित अनौपचारिक कार्यक्रमात राजवाडीच्या सरपंच सौ. सविता देवरुखकर यांनी सर्वांचं ग्रामस्थांच्या वतीने स्वागत केलं. बालपाहुण्यांनी काही शालेय समूहनृत्यं सादर केली. त्याचप्रमाणे प्रसिद्ध 'संगमेश्वरी बोली'चे जनक आनंद बोंद्रे यांच्या मार्गदर्शनानुसार जाखडीच्या बोलांवर नाचही केला. रात्री अस्सल कोकणी पद्धतीच्या माशाच्या कालवणाची चव चाखली आणि दोन दिवसांचा मुक्काम संपवून गुरुवारी सकाळी सर्वांनी रायगडच्या किल्ल्याकडे कूच केलं.
गडचिरोली जिल्ह्याच्या आदिवासी भागातली ही मुलं थेट राजवाडीत पोहोचणं एरवी अशक्यच. पण लोकबिरादरी प्रकल्पाच्या 'भामरागड ते रायगड' या सहल योजनेमुळे ते शक्य झालं. मुंबईचे सहल आयोजक केतन चोचे आणि संगमेश्वर लायन्स क्लबचे अध्यक्ष सतीश पटेल, संकेत खातू, मनिष चोचे, रिंकू कोळवणकर इत्यादींच्या पुढाकारामुळे हे घडून आलं. त्याचबरोबर, राजवाडीतले राजवैभव राऊत, सौरभ पांचाळ, सुहास लिंगायत, ऋषभ देवरुखकर, विलास पाटणकर इत्यादी तरुण मंडळी आणि सौ. सविता म्हादे यांच्या नेतृत्वाखाली महिला गटाच्या सदस्यांनी पाहुण्यांच्या निवास, भोजनाची व्यवस्था समर्थपणे सांभाळली.