04/07/2024
संकेत कुलकर्णी
आज ४ जुलै. आज २९५ वी पुण्यतिथी आहे सरखेल कान्होजी आंग्रे ह्यांची!
‘प्रिन्सेस ॲन’ नावाचं जहाज १७१८ मध्ये इंग्लंडवरून भारतामार्गे हॉंगकॉंगला चाललं होतं. जाताना पश्चिम किनाऱ्यावर मुंबईला येऊन मग ते पुढे गेले. ह्या जहाजाचा कॅप्टन होता निकोलस ल्यूहॉर्न. ह्याचा तसा कान्होजींशी प्रत्यक्ष कधीच संबंध वा संपर्क आला नव्हता. पण कान्होजींचं नाव त्या भागात इतकं प्रसिध्द होतं की त्यानं ते नक्कीच ऐकलं असावं. त्यावेळेस कंपनीच्या काही नाममात्र वाटाघाटीही कान्होजींसोबत चालल्या होत्या.
ल्यूहॉर्नचं जहाज मुंबईजवळून जाताना ह्याने एक नोंद लिहून ठेवली आहे. ह्यात तो लिहीतो “…Several Gallivats at shore to look out, believing them to belong to Angrey whom is reckoned the greatest rogue on all this coast to everybody except the English…”
(भावार्थ: “…किनाऱ्यावर भरपूर गलबतं होती, बहुतेक ती (कान्होजी) आंग्ऱ्यांची असावीत, (हे आंग्रे) इंग्रज सोडून इतरांसाठी ह्या किनारपट्टीवरचे सर्वात मोठे लुटारू म्हणून कुप्रसिध्द आहेत…”)
वाटाघाटी सुरु असल्या तरी कान्होजी इंग्रजांचे शत्रू होते हे तर जगजाहीर होतंच. म्हणून जाताजाता त्याने “Their boats always returning to the harbour in the evening” म्हणजे: “त्यांची (कान्होजींची) जहाजं बंदरात नेहेमी संध्याकाळी परत येतात”. ही नोंदही करून ठेवली आहे. म्हणजे कंपनीच्या आरमारास कान्होजींच्या आरमारावर हल्ला वगैरे करायचा झाला तर ही गोष्ट कामास येईल.
एकीकडे बोलणी करत आहोत हे दाखवून शत्रूवर बारीक पाळत ठेवायची इंग्रजांची सवयही जुनीच. पण कान्होजी आंग्र्यांचा भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरचा दबदब्याचा नुसता अंदाजही यायला ही एका तिऱ्हाईताची छोटीशी नोंदही पुरेशी आहे.
आज स्मृतिदिनानामित्त सरखेल कान्होजी आंग्र्यांना सादर प्रणाम!
- संकेत कुलकर्णी (लंडन)