23/05/2026
कालच बाजारात फेरफटका मारताना लक्षात आलं...
प्लास्टिक , मेणकापड , लोणचं बरण्या , जुना छत्री स्टॉक इ. इ. दिसायला लागलंय...
एका किराणा दुकानात तर " आगोटसाठी सामान मिळेल " असा बोर्डच टांगलेला आहे...
या दिवसात पुणेमुंबईकरांचा फोन आला , काय चाललंय मग असं कुणी विचारलं तर " आगोटची तयारी , जमवाजमव " हेच उत्तर असतं आमचं...
म्हणून 😃
#आगोट
शिमग्याचे होम पेटले नी कोकणात आंब्याला जोर चढला. वाढत्या गरम्याबरोबर आंब्याची आवक वाढू लागली. मार्केटात धामधुमीला सुरवात झाली. मुंबई गोवा हायवेवर पेट्या घेऊन जाणाऱ्या गाड्यांची वर्दळ वाढली. मार्केट सेट झाल्यावर अनेक ठिकाणी आंब्याच्या प्रायव्हेट विक्रीला सुरवात झाली. दरवर्षीप्रमाणे आमच्या घरातही आंबा विक्री सुरु झाली.
जिकडे पहावं तिकडे आंबा. दिवसभर गिऱ्हाईकांची ये जा. मे महिन्यात तर सुट्ट्या , लग्नसराई यामुळे नवनवीन गिऱ्हाईकं. मे महिन्याचे पहिले वीस दिवस धांदलीचे. यात मधेच लाईट गेले की हाश्यहुश्य ठरलेलं. सोमवार हा महावितरणचा जन्मवारच. हक्काने लाईट घालवणारच ते. तसा रविवार हा आंबा विक्रेत्याचा जन्मवार. घाई गडबड गर्दी दगदग हे ठरलेलं. मागच्या रविवारची ही गोष्ट.
सकाळी लवकर उठून , पूजा उरकून , मऊभात पोटात ढकलून आंबा विक्रीसाठी सज्ज झालो. पहिली दोनचार गिऱ्हाईकं होतायत तो तोरस्करीण आली.
' रं बावा , काय म्हणताय हापूस ' ती मला विचारती झाली.
' बराय , जतनं जतनं चाललाय गाडा ' मी उत्तरलो.
' हा , ह्ये चार रायवल आनलेत , भाऊंना नी वैनीना आवडतात ना. सगला उतरवून झाला कोवल्यासोवल्यासकट. पाऊस आला वेशीवर , फुकट कशा घालवायचो आंबो. इरल्याचं नी घरावरच्या शाकारणीचं कागद न्हेयला आलीली. उगा नंतर घाई नको...'
असं म्हणून चायचा घोट घेऊन ती बाजारला गेली. घेत नवती तरी पन्नास रुपये हातावर टेकवले. कोण आणून देणारे एवढं प्रेमाने ?
परत जरा गिऱ्हाईकांची वर्दळ कमी होतेय तो बावा मांडवकर हजर. त्याचे नी बाबांचे संवाद सुरु ...
' आज हिकडं खयलीकडं वाट चुकलाव मांडवकरानू ? '
' नाय ता जरा ... एक नोट हवी होती '
' गुलाबी की राखाडी ? '
' गुलाबी कशाला ती , पाचावर दोन पूज्य वाली द्या. गुरांची खाणी , दोन हत्यारं नी घराचा जिन्नस ... पुरतील '
नोट घेऊन निघाला तो आई म्हणाली , ' ओ मामा , एक दिवसभराचं काम आहे , लाकडाचं खोपटं सुधरायचंय नी बाकी साफसफाई ...'
परवा येतो असं सांगून तोही गेला.
दुपारची जेवणं घाईतच झाली. हातावर पाणी घेतोय तो पाठच्या दारी भंगारवाली ...
' गे वैनीबाय , पुस्तक पेपर रद्दी , बाटली पत्रा पलास्टीक हाय काय , पावसाच्या आदी देऊन टाक गो ...'
मग सगळं नको असलेलं तिला हवं त्याप्रमाणे देऊन झालं. पाणी पिऊन जरा शांत झाली. तिचाही खरं तर हाच सिझन. सुट्ट्यांमुळे घरात साफसफाया , आवराआवरी होतात , परीक्षा आटपलेल्या असतात . त्यामुळे तिलाही पावसाच्या आत चार पैसे पदरी पाडायचे असतात.
सगळं आवरुन पुढच्या दारी येऊन जरा बसतोय तो राबीयाबी चाची येताना दिसली.
' हाव ना जागी , मी म्हनला दुपारची झोपलाव काय ' इति चाची .
' नाय गो , आंब्यान् दमवलान. जरा सवड नाय बघ. ' मी म्हटलं.
' चांगलाय , वैनी हाय ना ? लोणचांबा आनलाय '
' गो चाची , पावसाचा ठिपका पडल्याशिवाय तुजी वहिनी लोणचं घालण्यातली नाही '
' नाय तसा नाय , पोरगो जायचाय म्होरल्या आटवड्यात बोटीवर , तं काय थंडीशिवाय यायचो नाय , वैनीच्या हातचा लोनचा आवडता '
' असं होय , मग घालील लोणचं आई , पुढच्या बाजारला येशील ती बरणी घेऊन ये '
चाची लोणचांबा देऊन गेली नी तेवढ्यात सड्यावरची विठा तुरुतुरु येताना दिसली.
पायरीवरच ती उभी .
' वाईच पानी दे रे बावा '
तांब्या हातात दिला नी म्हटलं 'वर तरी ये'
' नाय , पिशवीत सुकटं घेतल्येत , हयसरच बरा '
अख्खा तांब्या रिकामा करुन विठा गेली. पावसाचे दिवस येणार , मच्छी बाजारातून कमी होणार म्हणून सुकटाची बेगमी करायची तिची धांदल.
दुपारचा चहा होतोय तो परत गिऱ्हाईकांची रीघ. प्रत्येक वेळी ' आंबा उतरला का , पाऊस कधी , केरळला वेळेत येऊंदे ' हीच चर्चा. दिवस आला तसा घाईगडबडीत सरला. जेवणं झाल्यावर दुसऱ्या दिवशीची आवरा आवर करुन झाली नी निजायला जाताना घरभर पहुडलेल्या आंब्यांवर एक नजर फिरवून म्हटलं , " बावांनो , आपला बोरयाबिस्तरा आठ दिवसात आवरता घ्यायला हवा हो. ही कोकणी माणसं आगोटच्या तयारीला लागली ..."
Sj ( स्वानंद जोशी )
२१/५/१९