जिल्हा माहिती कार्यालय, सातारा ,District Information Office ,Satara

  • Home
  • India
  • Satara
  • जिल्हा माहिती कार्यालय, सातारा ,District Information Office ,Satara

जिल्हा माहिती कार्यालय, सातारा ,District Information Office ,Satara MAHARASHTRA GOVERNMENT PUBLICITY THROUGH SATARA OFFICE
Visit Our Twitter A/c- twitter.com/Info_Satara

कर्जमुक्ती योजनेच्या लाभ वितरणास प्रारंभ; प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस·         प...
07/08/2026

कर्जमुक्ती योजनेच्या लाभ वितरणास प्रारंभ; प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
· पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील ६.२२ लाख पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये ५,०२८ कोटींची रक्कम जमा
पुणे विभाग- १ लाख ४ हजार ६१ शेतकऱ्यांना ८६०.९७ कोटी रुपये,

मुंबई, दि. ७ : राज्यातील प्रत्येक पात्र शेतकऱ्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळणार असून, शेतकरी सक्षम, शेती समृद्ध आणि महाराष्ट्र अधिक प्रगत करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने ही महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली आहे. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दिशेने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, योजनेच्या पहिल्या टप्प्यात ६.२२ लाख पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये ५,०२८ कोटींची रक्कम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते थेट ऑनलाइन हस्तांतरित करण्यात आली.



सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कर्जमुक्ती योजनेच्या ऑनलाईन लाभ वितरणास प्रारंभ करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा, मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी, सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे तसेच सहकार आयुक्त दीपक तावरे उपस्थित होते. तसेच सर्व पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि सहकारी संस्थांचे निबंधक दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.



यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पहिल्या टप्प्यात आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या ६.२२ लाख शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये ५,०२८ कोटींची रक्कम थेट जमा करण्यात आली आहे. राज्य शासनाने सर्व बँकांना कर्जमुक्तीचा लाभ मिळालेल्या पात्र शेतकऱ्यांना तातडीने खरीप पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत, जेणेकरून शेतकऱ्यांना नव्याने शेतीसाठी आवश्यक आर्थिक बळ मिळेल.



ही योजना पूर्णपणे ऑनलाइन असून, शेतकऱ्यांना कुठेही अर्ज करण्याची आवश्यकता नाही. योजनेतील पात्र लाभार्थ्यांची यादी संबंधित बँकांनी महाआयटीने विकसित केलेल्या पोर्टलवर अपलोड केली असून, ग्रामपंचायत कार्यालये, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था तसेच संबंधित बँक शाखांमध्येही प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीतील प्रत्येक शेतकऱ्याला एक विशिष्ट क्रमांक देण्यात आला आहे. हा क्रमांक घेऊन शेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा केंद्रावर ॲग्रीस्टॅकवरील नोंदणी करून आधार प्रमाणीकरण करावे. एवढीच सहज आणि सोपी प्रक्रिया असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

ज्या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या अडचणी अथवा प्रलंबित बाबी असतील, त्या संबंधित पालकमंत्र्यांनी निदर्शनास आणुन द्यावे त्या सर्व विषयांवर मंत्रिमंडळ उपसमितीमध्ये सविस्तर चर्चा करून सकारात्मक निर्णय घेतला जाईल. अशा सूचनाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिल्या.

या योजनेतील कर्जमुक्ती आणि एकवेळ समझोता या घटकांच्या अंमलबजावणीसाठी राज्यातील ३० जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, १२ राष्ट्रीयकृत बँका आणि इतर खासगी बँकांसह एकूण ५३ बँकांनी महाआयटीने विकसित केलेल्या पोर्टलवर शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांची माहिती अपलोड केली आहे. विविध बँकांकडून सुमारे ३२ लाख कर्जखात्यांचा डेटा पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आला असून, ६ ऑगस्ट २०२६ अखेर १२.१० लाख कर्जखात्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्याची माहिती सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यांनी सादरीकरणाद्वारे दिली.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या टप्प्यात विभागनिहाय माहिती

अमरावती विभागात १ लाख ५८ हजार १४६ शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात १,३७२.१७ कोटींचा लाभ,

नाशिक विभाग- १ लाख ४० हजार ८९ शेतकऱ्यांना १,२०९.३९ कोटी रुपये,

छत्रपती संभाजीनगर विभाग- १ लाख ३० हजार ९३४ शेतकऱ्यांना ९३२.६१ कोटी रुपये,

पुणे विभाग- १ लाख ४ हजार ६१ शेतकऱ्यांना ८६०.९७ कोटी रुपये,

नागपूर विभाग- ७० हजार २९० शेतकऱ्यांना ५४४.७१ कोटी रुपये,

कोकण विभागातील १८ हजार ६८७ शेतकऱ्यांना १०८.८६ कोटीं रुपयांचा लाभ.

0000

सातारा जिल्ह्यातील 19 हजार शेतकऱ्यांना 142 कोटींची अधिकची कर्जमुक्ती; पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजनेतून निधी जमा    ...
07/08/2026

सातारा जिल्ह्यातील 19 हजार शेतकऱ्यांना 142 कोटींची अधिकची कर्जमुक्ती; पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजनेतून निधी जमा
- जिल्हाधिकारी संतोष पाटील
सातारा दि. 7 :- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात सातारा जिल्ह्यातील तब्बल 19 हजार 58 कर्ज खात्यांना मिळाला असून, एकूण 142 कोटी 7 लाख 39 हजार 284 रुपयांची रक्कम थेट संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली आहे.
या कर्जमुक्ती योजनेत सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सर्वाधिक योगदान दिले आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 16 हजार 995 कर्ज खात्यांवर एकूण 122 कोटी 9 लाख 59 हजार 848 रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला आहे. यामुळे बँकेच्या सभासद शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून कृषी क्षेत्राला पुन्हा एकदा नवसंजीवनी मिळण्यास मदत होणार आहे.
सहकारी बँकांसोबतच जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत आणि व्यापारी बँकांच्या माध्यमातूनही शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे. राष्ट्रीयकृत व व्यापारी बँकांमधील 2 हजार 63 कर्ज खात्यांवर 19 कोटी 97 लाख 79 हजार 436 रुपये जमा करण्यात आले आहेत.
प्रसिध्द झालेल्या यादीतील सुमारे 6 हजार शेतकऱ्यांनी अदयापही त्यांची ई-केवायसी पूर्ण करुन आधार प्रमाणीकरण केलेले नाही. अशा सर्व शेतक-यांनी त्यांचा शेतकरी ओळख क्रमांक (अॅग्रीस्टॅक फार्मर आयडी) तात्काळ काढून घ्यावा व आपले आधार प्रमाणीकरण पूर्ण करुन घ्यावे. म्हणजे सदर कर्जमुक्ती योजनेचा लाभ त्यांना तातडीने मिळणे सुलभ होईल.
मयत शेतक-यांच्या वारसांनी त्यांची वारस नोंद त्यांच्या महसूली दप्तरावर (७/१२ वर) करुन घेणेसाठी महसूल विभागाकडे वारसाच्या नावांसह अर्ज करणेत यावा, जेणेकरुन त्यांची वारस नोंद होऊन त्यांना शेतकरी ओळख क्रमांक (अॅग्रीस्टॅक फार्मर आयडी) काढणे व आधार प्रमाणीकरण पूर्ण करुन योजनेचा लाभ घेणे शक्य होईल. याबाबत सर्व तहसिलदारांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देणेत आले आहेत. शेतक-यांनी सदर योजनेबाबत कोणतीही अडचण असल्यास, जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समिती तसेच जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सातारा व तालुका स्तरावरील तहसिलदार आणि तालुका सहाय्यक निबंधक यांचेकडे संपर्क साधावा, असेही आवाहन जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी केले आहे.
0000

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६
06/08/2026

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६

06/08/2026

समाज कल्याण आयुक्त दिपा मुधोळ-मुंडे यांचा सातारा दौरा संपन्न

विविध योजना व शासकीय वसतिगृह बांधकामांची केली पाहणी



सातारा,दि.6: महाराष्ट्र राज्याच्या समाज कल्याण आयुक्त दिपा मुधोळ-मुंडे यांनी सातारा जिल्ह्याचा अधिकृत दौरा केला. त्यांनी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला आणि समितीच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले.

यावेळी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष जीवन गलंडे, उपायुक्त तथा सदस्य उमेश घुले, समाज कल्याणचे सहाकय आयुक्त सुनिल जाधव, जिल्हा समाज कल्याण अधिकारी विद्यानंद चल्लावार उपस्थित होते.

समाज कल्याण आयुक्तांनी जिल्हा परिषद समाज कल्याण विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेतला. मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्तीच्या पात्र लाभार्थ्यांना जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्यासाठी तालुकास्तरावर विशेष कॅम्प आयोजित करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाच्या योजनांचा आढावा घेताना, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना आणि कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेच्या अमलबजावणीत येणाऱ्या तांत्रिक अडचणींबाबत सहायक आयुक्त सुनिल जाधव यांनी माहिती दिली. यावर तांत्रिक मुद्द्यांबाबतचा सविस्तर प्रस्ताव तात्काळ आयुक्तालयाकडे सादर करण्याचे निर्देश आयुक्त महोदयांनी दिले.

या दौऱ्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन परिसरामध्ये आयुक्त दिपा मुधोळ-मुंडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर त्यांनी कोरेगाव येथील मुलांच्या शासकीय वसतिगृहाच्या इमारत बांधकामाची प्रत्यक्ष पाहणी केली आणि मंजूर आराखड्यानुसार दर्जा टिकवून लवकरात लवकर काम पूर्ण करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. त्यांनी कोरेगाव येथील केंद्रीय शाळेचीही पाहणी केली.

दौऱ्याच्या पुढील टप्प्यात सातारा येथील मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहांना भेटी देऊन तेथील सोयी-सुविधांचा आढावा घेण्यात आला. तसेच सातारा येथे सुरू असलेल्या मुलींच्या नवीन शासकीय वसतिगृह इमारतीच्या बांधकामाची पाहणी करून दर्जेदार काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

0000

06/08/2026

स्वातंत्र्यदिनानिमित्त हर घर तिरंगा अभियान प्रभावीपणे राबवा; ध्वज संहितेचे काटेकोर पालन करा

- जिल्हाधिकारी संतोष पाटील

सातारा,दि.6: स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात हर घर तिरंगा अभियान उत्साहात आणि लोकसहभागातून राबविण्यात यावे, तसेच १३, १४ आणि १५ ऑगस्ट या तीन दिवसांत प्रत्येक शासकीय कार्यालय, निमशासकीय कार्यालय आणि प्रत्येक घरावर राष्ट्रध्वज फडकविण्यात यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी सर्व संबंधित विभागांना दिल्या.

हर घर तिरंगा अभियानाच्या पूर्वतयारीसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल गावडे, प्रांताधिकारी आशिष बारकुल आणि नगर प्रशासन अधिकारी अभिजीत बापट यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

तिरंगा फडकविताना ध्वज संहितेचे तंतोतंत पालन करणे बंधनकारक असून राष्ट्रध्वजाचा सन्मान अबाधित राहील याची सर्वांनी दक्षता घ्यावी, तसेच विशेषतः १५ ऑगस्ट रोजी ध्वजारोहण तसेच ध्वजावतरण करताना ध्वज संहितेचे सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी दिले.

१४ ऑगस्ट रोजी फाळणी विभीषिका स्मृती दिन निमित्त भारताच्या फाळणीदरम्यान प्राण गमावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत. या शिवाय ९ ते १३ ऑगस्ट या कालावधीत वंदे मातरम्'चे सामूहिक गायन शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये व विविध संस्थांमध्ये आयोजित करण्याचे नियोजन करावे. स्वातंत्र्यदिनानिमित्त स्वातंत्र्य रॅलीचे प्रभावी नियोजन प्रत्येक विभागाने करावे. या रॅलीमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी, विविध संस्था, विद्यार्थी, स्वयंसेवी संघटना आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी केले.

0000

06/08/2026

आंतरराष्ट्रीय युवा दिन निमित्त रेड रन स्पर्धेमध्ये मुलांमध्ये साहील गायकवाड तर मुलीमध्ये रेश्मा करचे प्रथम

सातारा दि. 5: १२ ऑगस्ट आंतरराष्ट्रीय युवा दिन निमित्त एच. आय. व्ही/एड्स नियंत्रण कार्यक्रमामध्ये युवकांचा सहभाग वाढविणे व त्यांचेमध्ये एच. आय. व्ही/एड्स बाबत व्यापक जनजागृती करून जास्तीत जास्त युवकांपर्यंत पोहचून त्यांना चाचणीसाठी प्रोत्साहित करण्यासाठी स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील जिल्हा एड्‌स नियंत्रण विभागाच्या वतीने जिल्हास्तरीय रेड रन स्पर्धा चार भिंती ते अजिंक्यतारा किल्ला रोडवरती ५ कि. मी. साठी आयोजित करण्यात आली होती.

स्पर्धा शुभारंभ कार्यक्रम प्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून रुग्णालयाचे अति. जिल्ह शल्यचिकित्सक डॉ. अतुल लिपारे, जिल्हा एड्स नियंत्रण विभागाचे कार्यक्रम अधिकारी म्हणून हेमंत भोसले, एआरटी नोडल अधिकारी डॉ. पुनम लाहोटी यांची प्रमुख उपस्थिती होती. मुलांमध्ये डी. पी. भोसले कॉलेज, कोरेगाव मुलांमध्ये साहील अनिल गायकवाड याने प्रथम कंमाक मिळविला वर द्वितीय क्रमांक डी. जी. कॉलेज सातारच्या सोहन संतोष कदम याने व तृतीय क्रमांक छत्रपती शिवाजी कॉलेजच्या मनोज प्रकाश दंडवते यानी मिळविला.

मुलींमध्ये दहीवडी कॉलेज दहीवडीची रेश्मा रामचंद्र करचे हीने प्रथम क्रमांक घेतला, द्वितीय क्रमांक डी.जी. कॉलेज सातारच्या सुशिला बाळू मोरे हीने मिळविला व तृतीय क्रमांक आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा श्रुतीका हिंदूराव बर्गे हीने मिळविला. विजेत्याना रोख रक्कम व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

कार्यकमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन जिल्हा एड् नियंत्रण विभागाचे पुंडलिक पाटील यानी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्य शल्यचिकित्सक डॉ. राहुल जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.

0000

06/08/2026

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा येथे पी.सी. व पी.एन.डी.टी. कायद्यावरील विधी स्वयंसेवकांचे प्रशिक्षण संपन्न

सातारा, दि. 6: महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा यांच्या वतीने ५ ऑगस्ट रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा येथे पी.सी. अँड पी.एन.डी.टी. कायदा, स्त्री भ्रूणहत्या, मुलगी वाचवा अभियान व विधी स्वयंसेवकांची भूमिका या विषयावरील एकदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.

कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष अरविंद वाघमारे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव प्रियदर्शनी वाघमारे यांनी केले.

प्रशिक्षणामध्ये जिल्हा न्यायाधीत एस. आर. तांबोळी, बाल कल्याण समिती अध्यक्षा सुचित्रा घोगरे काटकर व अॅड, मनीषा बर्ग, एनेल विधीश व मध्यस्थ तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव प्रियदर्शनी वाघमारे यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. यामध्ये पी.सी. व पी.एन.डी.टी. कायद्याच्या तरतुदी, स्त्री भ्रूण्हत्येचे सामाजिक व कायदेशीर परिणाम, मुलींचे संरक्षण, तसेच बेकायदेशीर लिंग निश्चितीविरोधात विधी स्वयंसेवकांची भूमिका व जबाबदाऱ्या वाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

प्रशिक्षणास जिल्ह्यातील मोठ्या संख्येने विधी स्वयंसेवक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व नियोजन उत्कृष्टरीत्या पार पडले असून शेवटी अधीक्षक माया देसाई यांनी उपस्थितांचे आभार मानले.



गर्भलिंग निदान व स्त्री भ्रूणहत्या हे कायद्याने गुन्हा आहे. अशा कोणत्याही बेकायदेशीर प्रकाराची माहिती मिळाल्यास ती तात्काळ संबंचित आरोग्य प्रशासन यांना कळवावे असे, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा यांच्या वतीने करण्यात आले.

0000

06/08/2026

तरुणांसाठी - कम्बाईन हार्वेस्टर चालक प्रशिक्षण मेळाव्याचे ११ ऑगस्ट रोजी आयोजन

सातारा, दि. 6: महाराष्ट्र शासन कृषी विभाग, आत्मा विभाग, सातारा व कुबोटा प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांना आधुनिक कृषी यंत्रसामग्रीचा प्रभावी वापर करता यावा तसेच ग्रामीण भागातील तरुणांना कौशल्याधारित रोजगार व स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, या उद्देशाने -कम्बाईन हार्वेस्टर चालक प्रशिक्षण मेळावा मंगळवार, दि. ११ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता कृषी विकास भवन, तालुका कृषी अधिकारी, कार्यालय, सातारा येथे आयोजित करण्यात आला आहे.

ग्रामीण व स्थानिक भागातील १८ वर्षांवरील इच्छुक तरुण युवक, शेतकरी व कृषी यंत्रसामग्रीमध्ये रुची असणाऱ्या व्यक्तींनी या प्रशिक्षण मेळाव्यात सहभागी व्हावे. भविष्यात स्वयंरोजगाराची सधी निर्माण करण्यासाठी हे प्रशिक्षण उपयुक्त ठरणार आहे. या प्रशिक्षणामध्ये कॉम्बाईन हार्वेस्टरची प्राथमिक माहिती, सुरक्षितपणे यंत्र चालविण्याची पद्धत, यंत्राची देखभाल व दैनंदिन तपासणी, काढणीच्या वेळी घ्यावयाची काळजी तसेच प्रत्यक्ष यंत्र चालविण्याचे प्रशिक्षण याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. इच्छुक युवकांनी प्रशिक्षण मेळाव्यास उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुक कृषी अधिकारी तेजदिप ढगे यांनी केले आहे.

0000

सातारा जिल्ह्यात कर्जमुक्ती योजनेच्या ई-केवायसी ला वेग; ८० टक्के प्रक्रिया पूर्ण सातारा, दि. 6: पुण्यश्लोक अहिल्यादेवी ह...
06/08/2026

सातारा जिल्ह्यात कर्जमुक्ती योजनेच्या ई-केवायसी ला वेग; ८० टक्के प्रक्रिया पूर्ण



सातारा, दि. 6: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत सातारा जिल्ह्यात ई-केवायसी प्रक्रियेला चांगला प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत ३१ हजार ५५६ लाभार्थ्यांपैकी २५ हजार २५९ म्हणजे ८० टक्के शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण झाली आहे. ६ हजार २९७ म्हणजे २० टक्के लाभार्थ्यांची ई-केवायसी अद्याप बाकी आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रीक यांनी दिली आहे.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत २७ हजार २८६ लाभार्थ्यांपैकी २२ हजार ३९८ (८२ टक्के) शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण झाली असून ४ हजार ८८८ (१८ टक्के) लाभार्थ्यांची प्रक्रिया प्रलंबित आहे. तर राष्ट्रीयकृत व व्यापारी बँकांमध्ये ४ हजार २७० लाभार्थ्यांपैकी २ हजार ८६१ (६७ टक्के) शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण झाली असून १ हजार ४०९ (३३ टक्के) लाभार्थ्यांची ई-केवायसी अद्याप बाकी आहे.

प्रलंबित लाभार्थ्यांनी शक्य तितक्या लवकर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळवून घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

0000

Address

HAJERI MAL SADAR BAZAR
Satara
415001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when जिल्हा माहिती कार्यालय, सातारा ,District Information Office ,Satara posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share