08/07/2025
वालावल चे लक्ष्मीनारायण मंदिर आपल्या प्राचीन पण प्रगत स्थापत्यशास्त्राचे एक अद्भुत उदाहरण आहे. १४व्या शतकात बांधलेल्या या सुंदर हेमाडपंती मंदिराचा इतिहास खरं तर ९०० ते १००० वर्षांपूर्वीचा आहे असे सांगितले जाते. चार टप्यात बनलेल्या या मंदिरातील पहिल्या टप्प्यात म्हणजेच गाभाऱ्यात लक्ष्मीनारायणाची काळ्या पाषाणातली अत्यंत रेखीव मूर्ती अधिष्ठित आहे .त्याच्या समोरील दुसऱ्या टप्प्यामध्ये गर्भगृह सजलंय ते ०६ दगडी स्तंभावर & लाकडी छतावर, दोघांवरही अतिशय सुरेख असे कोरीव काम केलेले आहे. तिसरा टप्पा म्हणजे मुकसाळ जिथे एक मोठे कासव बसवून गर्भगृहाबाहेर एक मोठी घंटा लावली आहे आणि चौथा टप्पा म्हणजे बाहेरील मोठा सभा मंडप जिथे मंदिर संस्थानाचे सगळे कार्यक्रम होतात. मंदिराच्या मागील बाजूस लागूनच असलेले एक मोठे तलाव, त्याच्या आजूबाजूची गर्द हिरवी झाडी आणि मागील डोंगर असा निसर्गाचा साज शृंगार बघताना डोळे दिपून जातात.
कुडाळ पासून फक्त १० किलोमीटर वर असलेले हे सुंदर मंदिर प्रत्येकाने एकदा तरी नक्कीच पाहावे आणि तेथील सुंदरता & शांतता अनुभवावी अशी आहे.....
निलेश हळदणकर