23/12/2020
माझा #वेंगुर्ला #चौकोनीपाव #बिस्किट
"चौकोनी पाव- वेंगुर्ल्याची खासियत"
वेंगुर्ले हे स्वातंत्र्यपूर्व काळात आशिया खंडातील पश्चिम किना-यावरील आयात-निर्यातीचे प्रमुख व्यापारी केंद्र होते. पोर्तुगिज, डच यांची इथे सत्ता होती. वेंगुर्ले बंदराजवळील सागर बंगला, दीपगृह, इथली मंदिरे, फळसंशोधन केंद्र, विस्तीर्ण समुद्रकिनारा ही इथली आकर्षणे आहेत. इथली खाद्यसंस्कृतीही जरा हटकेच आहे. सकाळच्या नाष्ट्याला अगदी दुपारी २ पर्यंत इथल्या लहान-मोठ्या हॉटेलांतून उसळ - चौकोनी पाव आणि हाफ भजी, कटींग चाय यालाच जास्त मागणी असते. चाकरमानी देखील हॉटेलात यथेच्छ ताव मारुन चौकोनी पाव पार्सल बांधून घरी नेतात.
हे चौकोनी पाव फक्त वेंगुर्ल्यातच बनविले जातात. इथे सुरेश शिवलकर, नार्वेकर, भैरे, पाटणकर,सुदन रेडकर अशा मोजक्याच चौकोनी पाव बनविणा-या बेक-या आहेत. मीठ आणि साखर विरहीत असलेले हे पाव मैदा आणि चणाडाळ पिठाच्या फेसापासून बनविले जातात. यामध्ये ‘इस्ट‘ हे प्रिझरेटीव्ह नसल्यामुळे २४ तासच हे पाव चांगले राहू शकतात. याचं पीठ स्वतंत्र लाकडी भांड्यात भिजवले जाते. सध्या या व्यवसायाकरिता कारागिरांची कमतरता, पाव २४ तासच टिकण्याची मर्यादा यामुळे वेंगुर्ल्याबाहेर याचा प्रसार झाला नसल्याचे बेकरिवाले बोलतात. त्यामुळे वेंगुर्ल्यात आल्यावर फक्त इथेच मिळणारे उसळ आणि चौकोनी पाव खाल्ल्याशिवाय गेलात तर वेंगुर्ला भेट अपूर्ण राहील. इथल्या बेकरीत मिळणारी खास कुद्रे बिस्किटेही चाकरमानी मुंबईकर आवर्जून घेऊन जातात.
Forwarded as received