27/07/2026
डिस्ट्रिक्ट टूर ऑपरेटर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी आदित्य ठाकूर; सचिवपदी मोहसीन मुजावर
वार्षिक सर्वसाधारण सभेत नवीन कार्यकारिणीची घोषणा; पर्यटन व्यवसायात AI, संघटन बळकटीकरण व शासकीय स्तरावरील पाठपुराव्यावर भर
कोल्हापूर, प्रतिनिधी : डिस्ट्रिक्ट टूर ऑपरेटर्स असोसिएशन, कोल्हापूरची वार्षिक सर्वसाधारण सभा (AGM) उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. सभेत नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली असून, अध्यक्षपदी आदित्य ठाकूर, सचिवपदी मोहसिन मुजावर, उपाध्यक्षपदी विश्वजित साडोलकर आणि उपसचिवपदी शरद चौगुले यांची निवड जाहीर करण्यात आली. तसेच अरिहंत चौगुले व केदार मोहिते यांची संचालक म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली. इतर सर्व पदाधिकारी पूर्ववत कायम ठेवण्यात आले.
सभेच्या प्रारंभी संस्थापक संचालक मोहसिन मुजावर यांनी उपस्थित मान्यवर, सभासद व निमंत्रितांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. दीपप्रज्वलनानंतर विद्यमान अध्यक्ष सुरज नाईक यांच्या अध्यक्षतेखाली सभेच्या कामकाजास सुरुवात झाली.
सचिव रोहन नायर यांनी संस्थेच्या वर्षभरातील उपक्रमांचा सविस्तर अहवाल सादर केला. अभ्यास दौरे, प्रशिक्षण कार्यक्रम, व्यावसायिक नेटवर्किंग, सामाजिक उपक्रम तसेच सभासदांच्या हितासाठी राबविण्यात आलेल्या विविध योजनांचा आढावा त्यांनी घेतला. त्यानंतर कोषाध्यक्ष स्वरूप ताम्हणकर यांनी आर्थिक अहवाल सादर करून संस्थेच्या आर्थिक व्यवहारांची माहिती सभासदांसमोर मांडली.
अध्यक्ष सुरज नाईक यांनी पर्यटन क्षेत्रातील वाढत्या स्पर्धेत संघटितपणे काम करण्याची गरज अधोरेखित केली. आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार, सभासदांमधील समन्वय आणि व्यवसायातील गुणवत्ता वाढविण्यासाठी असोसिएशनने अधिक प्रभावी भूमिका बजावावी, असे त्यांनी सांगितले.
सभेतील चर्चासत्रात AI – आर्टिफिशीअल इंटेलिजन्स चा पर्यटन व्यवसायासाठी संधी कशी ठरू शकते, यावर सखोल चर्चा झाली. टूर नियोजन, ग्राहक सेवा, डिजिटल मार्केटिंग, ऑनलाइन बुकिंग, व्यवसाय व्यवस्थापन आणि माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून पर्यटन व्यवसाय अधिक स्पर्धात्मक कसा करता येईल, याविषयी तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.
यासोबतच पर्यटन उद्योगाला शासकीय, प्रशासकीय, सामाजिक व राजकीय स्तरावर अधिक प्रभावी प्रतिनिधित्व मिळण्यासाठी संघटित प्रयत्न करण्याची गरज व्यक्त करण्यात आली. पर्यटन व्यवसायास प्राधान्य मिळावे, विविध शासकीय योजनांचा लाभ सभासदांपर्यंत पोहोचावा आणि उद्योगाच्या प्रश्नांसाठी सक्षम पाठपुरावा व्हावा, यासाठी असोसिएशन अधिक सक्रिय राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
उपाध्यक्ष शरद चौगुले यांनी भविष्यातील ध्येय-धोरणांवर मार्गदर्शन करत बदलत्या पर्यटन क्षेत्रातील नव्या संधी, डिजिटल परिवर्तन आणि सभासदांतील समन्वय वाढविण्यावर भर दिला.
यानंतर झालेल्या मुक्त चर्चासत्रात सभासदांनी पर्यटन उद्योगासमोरील आव्हाने, व्यवसाय वृद्धी, शासकीय धोरणे आणि आगामी उपक्रमांबाबत सूचना मांडल्या. आवश्यक ठराव मंजूर करण्यात आले तसेच नियमानुसार मतदान प्रक्रिया पार पडली.
राष्ट्रगीताने सभेचा समारोप झाला. त्यानंतर सर्व उपस्थितांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले. या सभेला असोसिएशनचे पदाधिकारी, सभासद, पर्यटन क्षेत्रातील मान्यवर तसेच निमंत्रित पाहुणे मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पर्यटन व्यवसायात आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार, संघटनात्मक एकजूट आणि प्रभावी नेतृत्वाच्या बळावर जिल्ह्यातील पर्यटन उद्योग अधिक सक्षम करण्याचा निर्धार या सभेत व्यक्त करण्यात आला.